Showing posts with label स्वामी हो sssss. Show all posts
Showing posts with label स्वामी हो sssss. Show all posts

Saturday, April 19, 2014

पितळे नावाच्या गृहस्थांची कथा आणि श्री साईबाबा

साईबाबा आणि स्वामी समर्थ एक आहेत याची प्रचीती देणारी हि कथा.

संदर्भ : श्री साईसतचरित्र अध्याय २६. 

मुंबईचे कुणी पितळे नावाचे गृहस्थ सहकुटुंब सहपरिवार शिर्डीला साईंच्या दर्शनास आले होते. माझ्या साईंच्या लीला सातासमुद्रा पार जाउन होत्या.
नित्य हजारो लोक साईंच्या दर्शनास शिर्डीला येत होते, त्या भक्तांच्या पुरात वाहून आणि माझ्या साईंच्या प्रेमात न्हाऊन पितळे सुद्धा पुर्वासुकृताने शिर्डीला येउन पोहोचले. बिर्हाडी वस्ती करून श्रींच्या दर्शनास आले. 
त्यांचा मुलगा आजारी असावयाचा, त्याच्या वर साईंचा कृपाप्रसाद व्हावा म्हणून च पितळे यांनी शिर्डीस येणे केले होते. अर्थात शरण मज आला आणि वाया गेला ,दाखवा दाखवा ऐसा कुणी!! या वचनानुसार पितळे यांचे मनोरथ साईंनी पुरवले होते. 
   पितळ्यांनी आपला मुलाला बाबांच्या पायावर घातले,स्वतः लोटांगण घातले इतक्यात विपरीत घडले, मुलगा एकाएकी बेशुद्ध होऊन त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. आणि निपचित जमिनीवर  राहिला. असं या  कितीदा झालं होतं. पण प्रयत्न करून सुद्धा मुलगा शुद्धीवर येत नव्हता. मात पिता चिंतातूर झाले. 
आई आई रडून आक्रोश करू लागली. हे म्हणजे असे झाले कि वाघाच्या तोंडून गाय सुटावी आणि इतक्यात कसायाने तीस पकडून न्यावे. 
   मुलाच्या आईने साईबाबांना आळवले, प्रार्थना केली,  विनवण्या केल्या. 
बाबा तिला म्हणाले तुम्ही धीर धरा,  होऊ नका, त्याला काही होणार नाही, बिर्हाडी जा, एका घटकेनंतर त्याला शुद्ध येईल. पुढे तसे केले.बाबांचे बोल खरे ठरले. मुलगा हुशार होऊन बरा झाला. 
परत साईंच्या जवळ येउन त्यांनी बाबांचे पाय धरले, आलेला प्रसंग कृपाप्रसादाने टळला, याची कृतज्ञता व्यक्त करू लागले. पुढे काही दिवस बाबांची सेवा करून पितळे मुंबईस जाण्यास निघाले,  श्रींच्या दर्शनास आले. 
बाबांनी आशीर्वाद म्हणून खिश्यातून ३ रुपये काढले आणि त्यांस देत म्हणाले
'बापू तुला मी २ रुपये पूर्वी दिले होते, आता त्यात हे तीन रुपये ठेव आणि त्यांची पूजा कर, तुझे कल्याण होईल. पितळ्यांनी आनंदाने तो प्रसाद घेऊन मुंबईस परत जाणे केले. पण त्यांच्या मनात एक आश्चर्य सलत होते. 
    मी कधी साई बाबांना याआधी भेटलो नाही,मग ते 'मी तुला आधी २ रुपये  दिले होते' असे का म्हणाले. त्यांना काहीच कळत नव्ह्ते. 
    मुंबईस आल्यावर त्यांनी त्यांच्या आईला झालेला वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांची आई म्हणाली, तू जसा आता तुझ्या मुलाला घेऊन साईंच्या दर्शनास गेला होतास, तसेच तुझे बाबा तुझ्या लहान पणी तुला घेऊन अक्कलकोटला गेले होते.तिथे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. तिथले स्वामी सुद्धा सुद्धा सिद्ध होते, साक्षात दत्तावतारी होते. त्यांनी तुझ्या वडिलांना २ रुपये प्रसाद म्हणून दिले होते आणि त्यांची पूजा कर अशी आज्ञा केली होती. तुझे वडील शुद्धाचरणी होते. त्यांनी खूप प्रेमाने त्यांची देव्हार्यात ठेऊन पूजा केली,पुढे त्यांच्या माघारी त्या सर्वांचा विसर तुम्हाला पडला. तीच खुण साईबाबांनी पटवून दिली तुला. त्या रुपयांची अव्यवस्था तुझ्या हातून घडल्याने ते गहाळ झाले. आता वेड वाकडा व्यवहार सोड. आणि आपल्या पूर्वजांना अनुसरून तू वाग. या रुपयांची पूजा कर. अशा तर्हेने पितळे सत्कर्मास लागून त्यांनी साईभक्तीमध्ये व्यतीत केले. 
    

Friday, April 11, 2014

नको डगमगू स्वामी देतील साथ

पांडू सोनार

अक्कलकोटापासून ३ कोसावर मैंदर्गी नावाचे गाव आहे. तिथे पांडू सोनार नावाचा स्वामींचा भक्त राहत होता. कर्जबाजारीपणामुळे,दारिद्र्यामुळे  धनिकाला चांदीचे दागिने सोन्याचे पाणी मारून घडवून दिले.काही दिवस हि चोरी लपली.एके दिवशी झालेली हि फसवणूक धनिकाच्या लक्षात येउन त्याने पांडू सोनारावर मामलेदाराकडे फौजदारी खटला भरला. त्यात्यासाहेब मामलेदारांनी चाबकांच्या फटक्यांची शिक्षा सुनावली.  सोनाराच्या अब्रूचे भलतेच दिवाळे निघणार होते.
       सोनाराला स्वामींशिवाय आता तरणोपाय नव्हता,त्याने त्या दयाळू माउलीचा धावा सुरु केला.
हे स्वामी समर्थ माऊली,तुम्ही भक्तवत्सल आहात, मी या संसारात गंजून हे चौर्यकर्म केले आहे.मला पश्चाताप होत आहे.
स्वामी. मला वाचवा, लेकराची अब्रू वाचवा ,धाव स्वामी माउली धाव!!!!!!!
       भक्तवत्सल भक्ताभिमानी स्वामी समर्थांना सोनाराचा कळवळा आला. स्वामींची स्नानाची वेळ होती. सेवेकरी स्वामींच्या अंगावर उन पाण्याचा तांब्या घालणार इतक्यात, स्वारी गरजली.
       मेणा लाव!!
सेवेकर्यांनी मेणा आणून समर्थांचा जयजयकार करून सेवेकरी निघाले. समर्थांनी मैंदर्गीस जाण्याचा निर्देश केला. यात्रा निघाली.पुढे मैंदर्गीस आल्यावर कुण्या भक्ताकडे न जाता, कुठल्या मंदिरात,धर्मशाळेत न उतरता स्वारी थेट कचेरीत गेली. माम्लेदारास वाटले कि स्वामींनी आपला कृपाप्रसाद मज मिळावा या उद्देशाने कचेरीत येणे केले आहे. मामालेदाराने यथोचित आदर सत्कार करून आपली खुर्ची स्वामींना देववली.सोनार समोर च उभा होता.त्यास उद्देशून
'ये रे इकडे ये' !!
असे म्हणून जवळ बसावयास सांगितले. सोनार स्वामींच्या चरणाजवळ येउन बसला मामलेदारास त्याचा हेवा वाटला. स्वामींनी काही वेळाने सोनारास म्हणाले.
हं बसलास का,जा सरबराईस जा!!
असे ऐकताच पांडूने स्वामींच्या सेवेची व्यवस्था लावण्यास सुरुवात केली.दुसरे दिवशी पर्यंत सोनार स्वामींसन्निध होता. महाराजांचे त्या सोनारावरचे प्रेम पाहून मामालेदाराने पांडूची शिक्षा रद्द करून त्यास सोडून दिले. पुढे मोठ्या आनंदाने सोनाराने आपली घडलेली गोष्ट सेवेकार्यांस सांगितली असता.स्वामी स्नान करता करता मैंदर्गीस जाण्याची योजना सेवेकर्यांना कळून आली.
अशा तर्हेने 'स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे आशिर्वचन सार्थ करीत आहेत
।।श्री स्वामी समर्थ।।

Monday, April 7, 2014

लख्याची गोष्ट

एकदा मुंबईतील काही भक्त मंडळी अक्कलकोटला दर्शनास आली होती. हि सर्व बाणकोट मधील बालेमंडळी होती.त्यांत एक लख्या म्हणून लहान पोर्या होता.त्याला ब्रम्हचारी बुवांनी बाजारातून गुळ आणण्यास पैसे देऊन पाठवले.लख्या गुळ घेऊन येत असता त्याला मोह आवरला नाही.त्याने त्यातला गुळ खाण्यास सुरुवात केली. इकडे श्री स्वामी समर्थ म्हणू लागले.....'लखा भोसडीचो गुळ खाता...माका देत नाय'.....असे म्हणून स्वामी उं उं करून लहान मुलाप्रमाणे रडू लागले.
हा सगळा प्रकार पाहून त्यातील काही मंडळी बाजारकडे गेली.तेव्हा लख्या येता येता गुळ खाताना दिसला....तेव्हा समर्थांच्या कृतीचा सर्वांना उगम झाला.
स्वामी माउली कधी कधी अशीच गम्मत करत असे.कुणी दर्शनास आले कि त्यास त्याच्या मनातील ओळखून त्याची खुण पटवून देत. कधी कुणी परगाव चा अन्यभाषिक भक्त आला त्याला त्याच्या भाषेत बोलून अन्तःसाक्षित्वाची प्रचीती देत.
त्यांच्या जवळ एक पितळेची कडी होती.त्या कडीवर गणपती,लक्ष्मी,विष्णू अशा देवांची चित्रे कोरलेली होती.कुणी भक्त आला त्यास त्याच्या उपास्य इष्टदेवतेच्या चित्रावर बोट ठेवून त्यास खुण पटवून देत.

।।श्री स्वामी समर्थ।।
।।जय जय स्वामी समर्थ।।

Tuesday, March 25, 2014

श्री स्वामी समर्थांचे पशु- पक्ष्यांवरचे प्रेम


श्री स्वामी समर्थांची सत्ता या अखिल ब्रह्मांडावर आहे. सकळ प्राणीमात्रांमध्ये चैतन्य श्री स्वामींमुळे आहे.असा स्वमिभाक्तांचा ठाम विश्वास आहे. आणि त्याची प्रचीती त्यांना येतेच. स्वामींचे प्राण्यांवर खूप प्रेम होते.त्यांच्या सानिध्यात गायी,बैल,घोडे,कुत्रे नेहमीच असायचे. स्वामींना त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा होता.त्यांना ते प्रेमाने भरवत, त्यांच्या पाठीवरून हात फिरवत. निर्वाण समयी स्वामींनी सेवेकर्यांना आज्ञा केली होती कि सर्व जनावरांना मज जवळ आणा.
स्वामींनी त्यांच्या अंगावर आपल्या शाली, छाट्या टाकल्या होत्या,खूप प्रेमाने आणि करुणेने त्यांच्या अंगावरून हात फिरवला होता. आणि कसे काय कुणास ठाऊक त्या मुक्या जनावरांना सुद्धा कळले होते कि स्वामी आता जाणार. गायी वासरांच्या, घोड्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते.गायी हंबरडा फोडत होत्या.

Wednesday, February 26, 2014

श्री गणेश आणि स्वामी!!


गणपती वर स्वामींचे खूप प्रेम होते. अक्कलकोटात त्यांनी ठीक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. वटवृक्ष मंदिरामधल्या गणेशाची स्थापना सुद्धा स्वामींनी स्वहस्ते केली.
अक्कलकोट च्या जुन्या राजवाड्यात स्वामींची स्वारी बर्याचवेळा जाई. राजवाड्याचा भव्य दरवाजा तब्बल १२ ते १५ फुट उंच. दरवाज्याला एक झरोका आहे. सामान्य माणूस दरवाज्याच्या झरोक्यातून सहज आत बाहेर करू शकतो. दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या भागात गणपतीची लाकडात कोरलेली एक तस्वीर आहे. त्या तस्विरीला येता जाता स्वामी सहज लीलया हात लावीत आणि म्हणत 'मेरा गण्या'


एका औंसत मनुष्याला हात वर करून, पायाच्या टाचा उंचावून सुद्धा तिथे पोहोचणे शक्य नाही. स्वामी दाशरथि रामाप्रमाणे आजानुबाहू(त्यांचे हात गुढग्यापर्यंत लांब होते) होते.

स्वामी समर्थ समाधी मठ. चोळप्पा महाराजांचे घरी.



विश्वव्यापक विश्वंभरु|
त्याची कैची समाधी निर्धारु|
जगी जगप्रकार दाखवणे साचारु|
लीला थोरु समर्थांची||
-सद्गुरू आनंदनाथ महाराज.

स्वामींचा परम भक्त चोळ्या याची इच्छा अशी होती कि समर्थांचे चिरंतर वास्तव्य आपल्याच घरी असावे. अशा धर्मभोळे पणातून स्वामी समर्थ असतानाच एके दिवशी चोळप्पानी आपल्या घराच्या अंगणात समाधी खोदावयास घेतली. चोळाप्पा समाधी खोदत होता इतक्यात स्वामींची स्वारी चोळप्पाच्या घरी आली. आणि समर्थांनी मुद्दामून विचारले 'काय रे चोळ्या काय करतोस?" चोळप्पाने काहीच उत्तर नाही दिले. त्याला वाटले कि स्वामींना काहीच सांगितले
नाही तर त्यांना कशासाठी हा खटाटोप चाललाय हे कळणार नाही. स्वामी समर्थ प्रत्यक्ष परब्रम्ह होते, स्वामींच्या अन्तःसाक्षित्वाची प्रचीती चोळप्पाने वारंवार अनुभवली असूनही चोळाप्पांची प्राकृत बुद्धी त्यावेळी चालली नाही.
स्वामी त्याला म्हणाले 'चोळ्या यात आधी तुला घालीन मग च मी जाईन'. पुढे चोळप्पा महाराजांचे निधन झाले.त्यानंतर काही वर्षांनी स्वामी समर्थांचे निर्वाण झाले. आणि भक्ताच्या इच्छे खातीर चोळप्पाच्या घरी समाधी मठ आहे.
अक्कलकोट वटवृक्ष मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर हा समाधी मठ आहे. दररोज हजारो भक्तांची रीघ तिथे लागलेली असते. मठात आल्यावर परम समाधान लाभते.बाजूलाच चोळप्पा महाराजांचे घर आहे. तिथे समर्थांनी वापरलेल्या वस्तू आहेत. त्या पहावयास मिळतात. स्वामींनी अक्कलकोटात येउन दुसरी लीला चोळप्पाच्या घरी केली ती म्हणजे ऐन दुष्काळात चोळप्पाच्या विहीर सुकी खडखडीत असताना तीत लघुशंका करून तिला पाणी आणवले. आज कितीही दुष्काळ असला म्हणजे ती विहीर कधीच आटत नाही. ती विहीर कुशावर्त तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे.

Monday, February 24, 2014

भारतातील दत्तक्षेत्रे.

श्री स्वामी समर्थ.
भारतातील दत्तक्षेत्रे.


अक्कलकोट,
गाणगापूर,
पीठीकापुरम,
कुरवपुरम,
नरसोबाची वाडी,
कारंजा,
कर्दलीवन.
दत्त शिखर,माहूर,
औदुम्बर,

सदर छायाचित्रीत नकाशा संथनाम श्रीनिवासन यांच्या फेसबुक पोस्ट वरून घेतला आहे.


Tuesday, February 18, 2014

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे'

||अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज,योगीराज,परब्रम्ह,जगद्पालक-जगद्मालक,जगद्पिता-जगद्माता, श्रीपादश्रीवल्लभ,श्रीनृसिंहसरस्वती 
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय|| 

ओळख तो आवाज, ओळख ती खुण,

भक्तासाठी तो फिरत आहे अजून,
त्याला उगम नव्हता त्याला अंतही नाही,
त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही,
त्याला स्मर देहभान विसरून,
तो हळुवार येईल आणि कानी सांगून जाईल,

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे'

श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचे तिसरे पूर्णावतार.

नृसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेच्या निमित्ताने कर्दली वनात गुप्त झाले. याच वनात तीनशे वर्षे ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात त्यांच्या दिव्य शरीराभोवती मुंग्यांनी प्रचंड वारूळ निर्माण केले. या जंगलात एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळावर चुकून बसला व श्री स्वामी वारुळातून बाहेर आले. 
'त्यानंतर स्वामींनी पूर्ण भारत भर भ्रमण केले.व त्यानंतर अक्कलकोटी येउनि स्थिरावले. या काळात त्यांनी अनेक भक्तांना दत्तरुपत दर्शन दिले तर कुणाला दृष्टांतामधून दत्तरुपाने 'मी सध्या प्रत्यक्ष रूपाने अक्कलकोटी आहे'. असे सांगितले.
त्याच ह्या कथा. 


१) एके दिवशी गाणगापुरातले काही पुजारी श्रींच्या दर्शनाला आले.दर्शन झाल्यानंतर समर्थांनी त्यांना तुमच्या देवाचे नाव काय असे विचारले. त्यावर पुजार्यांनी 'नृसिंहसरस्वती' असे उत्तर दिले. त्यावर समर्थ म्हणाले आमच्या देवासही नृसिंहभान असे म्हणतात बरे! 

२) एका घाटावरील ब्राह्मणाने गाणगापुरच्या नृसिंहसरस्वतींना मुलगा झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरात येउन करेन असा नवस केला. मुलगा झाला, त्यानंतर काही वर्षांनी नवस फेडावयास म्हणून तो ब्राह्मण सहकुटुंब गाणगापुरास निघाला.
अक्कलकोटा नजीक येउन नेमके त्याच्या जवळचे पैसे संपले. त्यांने स्वामी समर्थांविषयी ऐकले होते. तो स्वामींच्या दर्शनास आला आणि स्वामींजवळ त्याने आपले मनोगत व्यक्त केले कि आता गाणगापुरला जाउन नवस फेडणे शक्य नाही तरी तुम्ही प्रत्यक्ष दत्तावतारी आहात. मी तुमच्या इथेच नवस फेडतो. स्वामींनी मान हलवली. इतक्यात ब्राम्हणाला पैशाची मदत होऊन त्याने उपनयन विधी हि उरकला आणि मोठ्या आनंदाने तो स्वगृही आला. त्यानंतर प्रत्यक्ष दत्तगुरूंनी नवसाची सांगता झाल्याचा स्वप्नात दृष्टांत झाला .

2)  मुंबईचे ठाकूर दास बुवा हे मुळचे दत्तभक्त, गाणगापुरच्या श्रींवर श्रद्धा होती. पुढे प्रारब्धकर्माने त्यांच्या अंगावरती श्वेतकुष्ठ आले. चेहरा विद्रूप दिसू लागला. दोन वर्षापर्यंत अनेक उपचार केले पण काही गुण आला नाही. त्यांना खूप दुःख झाले. त्यांनी ठरवले कि आता काशी क्षेत्रात वास करून राहणे योग्य. तेव्हा ते सहकुटुंब गाणगापुरला शेवटचे दर्शन घेण्यास निघाले. श्रींच्या पादुकांवर त्यांनी कस्तुरी अर्पण करावी अशी त्यांची इच्छा होती. तसे त्यांनी उत्तम कस्तुरी विकत घेऊन आणली होती. दर्शन घेऊन ते ती कस्तुरी पादुकांवर अर्पण करण्यास विसरले. पुढे त्यांनी देवळात कीर्तन केले. उत्तम प्रकारे मनोभावे सेवा केलि. व काशीस जाण्याची आज्ञा मागितली. रात्री स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला. दत्तगुरू स्वये स्वप्नात येउन म्हणाले कि मी अक्कल्कोति वास करून आहे, माझे तुला प्रत्यक्ष दर्शन होइल. आणि तुझा कुष्टपरिहार होइल.सकाळी बुवांना स्वप्नाचे स्मरण झाले. त्यासरशी बुवांनी दर्शन घेऊन अक्कलकोट चा रस्ता धरला. अक्कलकोटी आल्यानंतर स्वामींना पाहून ते हरवून गेले.लगबगीने दर्शन घेण्यासाठी चरणावरती डोके ठेवले इतक्यात स्वामी त्यांस म्हणाले. 'हमारी कस्तुरी अभी का अभी लाव' 
बुवांना कस्तुरी श्री दत्तां प्रित्यर्थ आणल्याचे स्मरले,परंतु ती गाणगापुरला अर्पण करण्यास  विसरलो याची जाणीव झाली आणि स्वामी समर्थ साक्षात दत्त अवतार आहेत,त्यांच्या अन्तःसाक्षित्वाची कल्पना आली. लगेच च त्यांनी कस्तुरी स्वामींना अर्पण केली. स्वामींनी हसत हसत ती तिथे असलेल्या लहान मुलांमध्ये वाटून टाकली. पुढे काही काळाने स्वामी कृपेने बुवांचा दुर्धर श्वेतकुष्ठ बरा झाला . 

३)कर्नाटकातील श्रीधर नावाचा गृहस्थ पोटशूलाच्या व्याधी ने त्रस्त झाला होता. बरेच दिवस तो गुण यावा म्हणून गाणगापुरला दत्तपादुकांची सेवा करत होत. एके रात्री यतीरुपाने दत्तगुरूंनी स्वप्नात येउन त्याला सांगितले श्रिपुरिच्या झाडाचा रस काढून त्यात सैंधव व सुंठ घालून सेवन कर म्हणजे तुझी व्याधी जाइल.सकाळी त्याला याचे स्मरण झाले. पण श्रिपुरिचे झाड म्हणजे नेमके कोणते हे त्यास कळेना. त्याने गावातील जाणकारांना, वैद्यांना याबाबत विचारले पण कुणीच काही संगे ना,श्रीधर अशाच भ्रांतीत असताना त्यास श्रींनी स्वप्नात येउन सांगितले कि अक्कलकोटास परमहंसस्वामी आहेत, ते तुला याबद्दल सांगतील. तो दुसरे दिवशी तडक अक्कलकोटास गेला, श्रींची मूर्ती पाहून त्यास परम समाधान झाले. दर्शन घेणार इतक्यात स्वामींनी त्यास सांगितले अरे कडूनिंबाच्या झाडास श्रिपुरि असे म्हणतात त्यात सैंधव आणि सुंठ घालून तीन दिवस घे म्हणजे तुझी व्याधी जाइल. तसे केल्यानंतर श्रीधर चा पोटशूळ नाहीसा झाला. 

श्री स्वामींची श्री पूज्य गोपाळ बुवा केळकर लिखित बखर वाचल्यास कितीतरी जणांना जे गाणगापूर, नरसोबाची वाडी, पंढरपूर अशा ठिकाणी उपासना करत होते त्यांना अक्कलकोटी प्रत्यक्ष रूपाने दर्शन होईल असे दृष्टांत झाल्याच्या कथा दखल म्हणून आहेत. आजही कित्येक भाविकांना याची प्रचीती येते. तर माणिकप्रभू, साईबाबा, गजानन महाराज यांनी सुद्धा स्वामी समर्थ आणि आमच्यात काही भेद नाही अशा लीला भक्तांना दाखविल्या त्याबद्दल च्या नोंदी श्री साई चरित व इतर चरित्रांमध्ये आहेत. 

येथे भक्तकवी मिलिंदमाधव कृत स्वामींच्या छोट्या चरित्र पोथीमधील काही श्लोकांचा संदर्भ द्यावासा वाटतो. 

स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे |
तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||

पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ |
गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||

तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार |
अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||

।।श्री स्वामी समर्थ ।।
जय जय स्वामी समर्थ ।।






Monday, February 17, 2014

श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे अधिपती.


अक्कलकोट चे राजे शहाजी राजे निर्वतल्या नंतर मालोजीराजे गादीवर नुकतेच बसले होते.चिंतोपंत टोळांना सांगितल्या प्रमाणे स्वामी सोलापूर हून अक्कलकोट ला आले.यवन रीसालदाराला रिकाम्या चिलिमितुन धूर काढून दाखवण्याची पहिली लीला समर्थांनी दाखवली.नंतर ऐन दुष्काळात चोळाप्पाच्या कोरड्या ठणठणीत विहिरीला पाणी आणून दाखवण्याचा चमत्कार केला. तेव्हा अक्कलकोट वासी जनांना स्वामींची महती कळू लागली होती.थोडे दिवस गेल्यानंतर दरम्यान मालोजीराजे दरबारात बसले असता त्यांच्या कानावर अक्कलकोटात कुणी चमत्कारी साधू अवतरलेत  अशी वार्ता राजांच्या कानावर पडली. त्यावेळी मालोजीराजे म्हणाले 'ते जर खरंच साधू पुरुष असतील तर ते आत्ता या क्षणी आम्हाला इथे दर्शन देतील.' एवढ्यात स्वामींनी तिथे प्रकट होऊन मालोजीराजांच्या मनातला विकल्प नाहीसा करून  त्यांची इच्छा पुरवली.त्या नंतर अनेकानेक लीला स्वामी करत च होते.आणि मालोजी राजांची श्रद्धा स्वामींवर जडली.

पण मनुष्याची भक्ती तेव्हा परमेश्वर कबुल करतो जेव्हा मनुष्य देहबुद्धी अहंकारी वृत्ती सोडून परमेश्वराला शरण जातो.
मालोजी राजे संस्थानिक होते.साहजिक च त्यांना इतमाम, दरबार, उंची राहणी या सगळ्यांचा शौक होताच.
एके दिवशी स्वामी वटवृक्षा खाली बसले असता मालोजीराजे दर्शनास आले.
पण स्वतः हत्तीच्या अंबारीत बसून ,छत्र चामरे, अशा थाटात लवाजम्यासहित आले. राजा आपल्या वैभवाच्या तंद्रीत हत्तीवरून खाली उतरला, समर्थांपुढे येऊन हात जोडून उभा राहिला इतक्यात खाडकन आवाज आला. स्वामींनी राजाच्या कानाखाली मारली, राजाची मानाची पगडी ३ हात बाजूला जाउन पडली. राजाला काय झाले समजले नाही. स्वामी क्रोधाने म्हणाले ' अरे तुझे मोठेपण तुझ्या घरात, ऐसे बुद्बलके राजे हम हररोज बनाते है!
मग राजास लक्षात आले. कि आपण हा मोठेपणाचा थाट करून दर्शनास येतो. त्यावेळी आपल्या मनात
अहंकार भावना असते.
त्या दिवसापासून राजा स्वामी कुठेही असले म्हणजे दर्शन करावयास आला कि हत्ती,छत्र चामरे लांब  उभी करून स्वतः पादचारी चालत येई व इतर भाविकांप्रमाणे,सामन्याप्रमाणे दर्शन घेई. राजाला कळून चुकले आपण फक्त संस्थानिक आहोत पण स्वामी म्हणजे साक्षात ब्रह्मांडनायक आहेत.
स्वामींनी असाच भल्या भल्यांचा ताठा जिरवला. बाष्कळ अभिमानाने अंध झालेल्यांना सन्मार्गावर आणले.
स्वामी ब्रह्मांड नायक आहेत याचा दाखला देणाऱ्या अनेक कथा आपण या ब्लॉग च्या माध्यमातून पाहूच.
||श्री स्वामी समर्थ||
||जय जय स्वामी समर्थ || 

श्री स्वामी माऊलीची एक चित्तवेल्हाळ चित्तवृत्ती.

  श्री स्वामी समर्थ माऊलीची बालोन्मतपैशाच्य वृत्ती प्राकृत जनांना वेड्यासारखी वाटे.पण अशा लोकांना स्वामी त्यांच्या गूढ बोलण्यातून किंवा कृतीतून अन्तःसाक्षित्वाची खुण पटवून,क्षणात अवतारी असल्याचा दाखला देऊन त्यांना भक्ती मार्गाला लावीत.त्यांचा नूर कधी उग्र असला तर राजे रजवाडे असोत किंवा स्वामींचे निकटवर्तिय सेवेकरी असोत त्यांना स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहवत नसे किंवा जवळ उभे राहण्याचा धीर होत नसे. स्वारी रागात असली कि ७-७ दिवस राग जात नसे. पण कुणी दुखी कष्टी असेल तर या माऊलीचं हृदय चटकन द्रवायचं.आणि म्हणूनच स्वामींची लेकरं स्वामी समर्थांना 'भक्तवत्सल माय'असं म्हणतात,मानतात.

 ||श्री स्वामी समर्थ ||
||जय जय स्वामी समर्थ|| 
|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||