Wednesday, February 26, 2014

स्वामी समर्थ समाधी मठ. चोळप्पा महाराजांचे घरी.



विश्वव्यापक विश्वंभरु|
त्याची कैची समाधी निर्धारु|
जगी जगप्रकार दाखवणे साचारु|
लीला थोरु समर्थांची||
-सद्गुरू आनंदनाथ महाराज.

स्वामींचा परम भक्त चोळ्या याची इच्छा अशी होती कि समर्थांचे चिरंतर वास्तव्य आपल्याच घरी असावे. अशा धर्मभोळे पणातून स्वामी समर्थ असतानाच एके दिवशी चोळप्पानी आपल्या घराच्या अंगणात समाधी खोदावयास घेतली. चोळाप्पा समाधी खोदत होता इतक्यात स्वामींची स्वारी चोळप्पाच्या घरी आली. आणि समर्थांनी मुद्दामून विचारले 'काय रे चोळ्या काय करतोस?" चोळप्पाने काहीच उत्तर नाही दिले. त्याला वाटले कि स्वामींना काहीच सांगितले
नाही तर त्यांना कशासाठी हा खटाटोप चाललाय हे कळणार नाही. स्वामी समर्थ प्रत्यक्ष परब्रम्ह होते, स्वामींच्या अन्तःसाक्षित्वाची प्रचीती चोळप्पाने वारंवार अनुभवली असूनही चोळाप्पांची प्राकृत बुद्धी त्यावेळी चालली नाही.
स्वामी त्याला म्हणाले 'चोळ्या यात आधी तुला घालीन मग च मी जाईन'. पुढे चोळप्पा महाराजांचे निधन झाले.त्यानंतर काही वर्षांनी स्वामी समर्थांचे निर्वाण झाले. आणि भक्ताच्या इच्छे खातीर चोळप्पाच्या घरी समाधी मठ आहे.
अक्कलकोट वटवृक्ष मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर हा समाधी मठ आहे. दररोज हजारो भक्तांची रीघ तिथे लागलेली असते. मठात आल्यावर परम समाधान लाभते.बाजूलाच चोळप्पा महाराजांचे घर आहे. तिथे समर्थांनी वापरलेल्या वस्तू आहेत. त्या पहावयास मिळतात. स्वामींनी अक्कलकोटात येउन दुसरी लीला चोळप्पाच्या घरी केली ती म्हणजे ऐन दुष्काळात चोळप्पाच्या विहीर सुकी खडखडीत असताना तीत लघुशंका करून तिला पाणी आणवले. आज कितीही दुष्काळ असला म्हणजे ती विहीर कधीच आटत नाही. ती विहीर कुशावर्त तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे.



श्री स्वामी समर्थ म्हणजे परब्रह्म, असे असताना त्यांनी समाधी कशी घेतली किंवा त्यांचा सामान्याप्रमाणे मृत्यू कसा? असा प्राकृत जनांना प्रश्न पडतोच. या प्रश्नाला उत्तर आहे. ते उत्तर अधिकार्यालाच मिळेल. मग तो नास्तिक असला तरी.
खरं तर याचे उत्तर मिळणे म्हणजेच आस्तिकतेच्या मार्गावरचे पहिले पाऊल.

स्वामी समर्थांचा देह, दिनक्रम जरी सामान्याप्रमाणे असला तरी त्यांच्या लीला अतर्क्य होत्या. त्यांना निद्रा-झोप कधी लागत नसे. नुसते डोक्यावर शाल ओढून झोपले जरी असले आणि इथे कुणी सामान्य मनुष्याच्या फक्त मनात मध्यरात्री जरी काही शंका आली तरी त्या शंकेचे निरसन समर्थ पांघरुणातून च करत.

समर्थ सामान्याप्रमाणे जेवत, सामान्याप्रमाणे त्यांच्या आवडी निवडी होत्या. पण कधी मनात आले तर १५-१५ दिवस जेवत नसत. आणि अशावेळी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज, अंगामधील उत्साह कायम असे. हे सामान्याला कसे जमेल?

निर्वाण होणार त्याचे सुद्धा संकेत त्यांनी दिले होते. वेळो वेळी देत होते. मनुष्यामध्ये राहून त्यांच्यामधील प्राकृत अहंभाव, जातीद्वेष-जातीभेद, सोवळे-ओवळे, शिवा-शिव, अंधश्रद्धा अशा अमानुषी पद्धती,विचार सारणी त्यांनी त्यांच्या लीलांमधून दूर केल्या. हे बखर वाचल्यावर समजेल च.

समर्थांनी निर्वाण समयी लेकरांना 'हम गया नही जिंदा है!!'
'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असे अभय आशीर्वचन दिले होते. आणि आज निर्वाणानंतर हि या वचनांची प्रचीती असंख्य भक्तांनी घेतलीय. आज याचे दाखले असंख्य स्वामीभक्त देतील तसेच साईबाबांनी सुद्धा सांगितले होते.  'माझी हाडे समाधीतून बोलतील' याचा सुद्धा असंख्य साई भक्तांना प्रत्यय येतो आहे.

||श्री स्वामी समर्थ||

No comments:

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||