Saturday, April 19, 2014

पितळे नावाच्या गृहस्थांची कथा आणि श्री साईबाबा

साईबाबा आणि स्वामी समर्थ एक आहेत याची प्रचीती देणारी हि कथा.

संदर्भ : श्री साईसतचरित्र अध्याय २६. 

मुंबईचे कुणी पितळे नावाचे गृहस्थ सहकुटुंब सहपरिवार शिर्डीला साईंच्या दर्शनास आले होते. माझ्या साईंच्या लीला सातासमुद्रा पार जाउन होत्या.
नित्य हजारो लोक साईंच्या दर्शनास शिर्डीला येत होते, त्या भक्तांच्या पुरात वाहून आणि माझ्या साईंच्या प्रेमात न्हाऊन पितळे सुद्धा पुर्वासुकृताने शिर्डीला येउन पोहोचले. बिर्हाडी वस्ती करून श्रींच्या दर्शनास आले. 
त्यांचा मुलगा आजारी असावयाचा, त्याच्या वर साईंचा कृपाप्रसाद व्हावा म्हणून च पितळे यांनी शिर्डीस येणे केले होते. अर्थात शरण मज आला आणि वाया गेला ,दाखवा दाखवा ऐसा कुणी!! या वचनानुसार पितळे यांचे मनोरथ साईंनी पुरवले होते. 
   पितळ्यांनी आपला मुलाला बाबांच्या पायावर घातले,स्वतः लोटांगण घातले इतक्यात विपरीत घडले, मुलगा एकाएकी बेशुद्ध होऊन त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. आणि निपचित जमिनीवर  राहिला. असं या  कितीदा झालं होतं. पण प्रयत्न करून सुद्धा मुलगा शुद्धीवर येत नव्हता. मात पिता चिंतातूर झाले. 
आई आई रडून आक्रोश करू लागली. हे म्हणजे असे झाले कि वाघाच्या तोंडून गाय सुटावी आणि इतक्यात कसायाने तीस पकडून न्यावे. 
   मुलाच्या आईने साईबाबांना आळवले, प्रार्थना केली,  विनवण्या केल्या. 
बाबा तिला म्हणाले तुम्ही धीर धरा,  होऊ नका, त्याला काही होणार नाही, बिर्हाडी जा, एका घटकेनंतर त्याला शुद्ध येईल. पुढे तसे केले.बाबांचे बोल खरे ठरले. मुलगा हुशार होऊन बरा झाला. 
परत साईंच्या जवळ येउन त्यांनी बाबांचे पाय धरले, आलेला प्रसंग कृपाप्रसादाने टळला, याची कृतज्ञता व्यक्त करू लागले. पुढे काही दिवस बाबांची सेवा करून पितळे मुंबईस जाण्यास निघाले,  श्रींच्या दर्शनास आले. 
बाबांनी आशीर्वाद म्हणून खिश्यातून ३ रुपये काढले आणि त्यांस देत म्हणाले
'बापू तुला मी २ रुपये पूर्वी दिले होते, आता त्यात हे तीन रुपये ठेव आणि त्यांची पूजा कर, तुझे कल्याण होईल. पितळ्यांनी आनंदाने तो प्रसाद घेऊन मुंबईस परत जाणे केले. पण त्यांच्या मनात एक आश्चर्य सलत होते. 
    मी कधी साई बाबांना याआधी भेटलो नाही,मग ते 'मी तुला आधी २ रुपये  दिले होते' असे का म्हणाले. त्यांना काहीच कळत नव्ह्ते. 
    मुंबईस आल्यावर त्यांनी त्यांच्या आईला झालेला वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांची आई म्हणाली, तू जसा आता तुझ्या मुलाला घेऊन साईंच्या दर्शनास गेला होतास, तसेच तुझे बाबा तुझ्या लहान पणी तुला घेऊन अक्कलकोटला गेले होते.तिथे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. तिथले स्वामी सुद्धा सुद्धा सिद्ध होते, साक्षात दत्तावतारी होते. त्यांनी तुझ्या वडिलांना २ रुपये प्रसाद म्हणून दिले होते आणि त्यांची पूजा कर अशी आज्ञा केली होती. तुझे वडील शुद्धाचरणी होते. त्यांनी खूप प्रेमाने त्यांची देव्हार्यात ठेऊन पूजा केली,पुढे त्यांच्या माघारी त्या सर्वांचा विसर तुम्हाला पडला. तीच खुण साईबाबांनी पटवून दिली तुला. त्या रुपयांची अव्यवस्था तुझ्या हातून घडल्याने ते गहाळ झाले. आता वेड वाकडा व्यवहार सोड. आणि आपल्या पूर्वजांना अनुसरून तू वाग. या रुपयांची पूजा कर. अशा तर्हेने पितळे सत्कर्मास लागून त्यांनी साईभक्तीमध्ये व्यतीत केले. 
    

Monday, April 14, 2014

कांदिवली गाव इथला मठ

     कांदिवली स्टेशन पश्चिम वरून चालत २० मिनिटांच्या अंतरावर कांदिवली गाव आहे.इथे जायला बस सुद्धा बर्याच आहेत.कांदिवली गाव या बस थांब्या जवळ राज हाईट नावाची एक इमारत आहे. तिथे जाऊन कुणाही स्थानिक माणसाला मठाविषयी विचारले असता मोठ्या आस्थेने तुम्हाला मठाचा पत्ता सांगितला जाईल. अक्कलकोट अपार्टमेंट च्या तळमजल्या वर हि सुंदर शांत मठी आहे.

        मठाजवळ आल्यावर विलक्षण चैतन्य, सात्विकता जाणवू लागते.फाटक उघडून आत जातानाच एक औंदुंबर आहे. मठात स्वामींची एक सुहास्यवदन तस्वीर ठेवलेली आहे.स्वामींच्या डोळ्यातले प्रेम बघून मन हरखून जाते.संगमरवरी बैठकीवर स्वामींची चैतन्यदायी मूर्ती आहे.पादुका आहेत.दर्शन घेताना खूप चैतन्य जाणवते. मठ छोटेखानी असला तरी प्रदक्षिणा मार्ग, भरपूर उजेड,खेळती हवा यामुळे ऐसपैस वाटतो,इतकी वर्ष कांदिवलीत राहत असून सुद्धा इतकी छान वस्तू इथे आहे याची मला कल्पनाच नव्हती. मला म्थाविषयी अजून माहिती हवी होती. पण संध्याकाळी अक्कलकोट अन्नछत्र मंडळाची पालखी येणार असल्याने सर्वच गडबडीत होते. पण एका काकूंनी सांगितले कि मुंबईतल्या महत्वाच्या मठांमध्ये हा एक मठ आहे.

      श्री शंकरराव काशिनाथ मंत्री हे श्री स्वामी समर्थांचे  भक्त. त्यांनी हा मठ १९७० बांधला. २०१० मध्ये भारत मंत्री यांनी मठाचा जीर्णोद्धार केला. या मठामध्ये प.पु स्वामीभक्त आनंद भारती महाराज(लक्ष्मण कोळी-ठाणे) यांनी स्वामींच्या पादुका स्वामींच्या आज्ञेनुसार दिल्या. अक्कलकोटा जवळ च्या शिवपुरी येथील प.पु गजानन महाराज यांनी या मठाला भेटी दिल्या आहेत. चोळप्पा महाराजांचे वंशज प.पु अण्णू महाराज यांनी सुद्धा इथे भेटी दिल्या आहेत.
      इथे वेळोवेळी उत्सव साजरे केले जातात .सकाळ संध्याकाळ आरती होते. आता मठाची व्यवस्था शंकररावांच्या पुत्री मेघा ताई बघतात.

मठाचा पत्ता :
      अक्कलकोट अपार्टमेंट,श्री स्वामी समर्थ लेन,
      कांदिवली महानगर पालिका शाळेजवळ,
      कांदिवली गाव,कांदिवली पश्चिम.

मठात कसे जाल :
      कांदिवली रेल्वे स्थानक पश्चिम वरून चालत २० मिनिटांवर कांदिवली गाव हा बस थांबा आहे. इथे मागेच हा मठ आहे. तसेच कांदिवली स्थानकावरून बस नंबर २०४ आणि २०७ इथपर्यंत जातात.

मठाच्या वेळा :
        सकाळी ६ ते १२.३०
        संध्याकाळी ७ ते ९.३०
आरती सकाळी ८.३० वाजता
आणि संध्याकाळी ७ वाजता.


।।श्री स्वामी समर्थ।।
।।जय जय स्वामी समर्थ।।


       
|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||