। श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ शुक्लपक्षीचा शशिकर । वाढे जैसा उत्तरोत्तर । तैसे हे स्वामी चरित्र । अध्यायाध्यायी वाढले ॥१॥ द्वादशाध्यायाचे अंती । श्रीपादभट्ट बाळाप्पाप्रती । कपट युक्तीने फसवू पाहती । परी झाले व्यर्थची ॥२॥ खिन्न झाला चोळप्पा । म्हणे श्रींची पूर्ण कृपा । मजहुनी तया बाळाप्पा । प्रिय असे जाहला ॥३॥ वर्तले ऐसे वर्तमान । बाळाप्पा एकनिष्ठा धरोन । स्वामीसेवा रात्रंदिन । अत्यानंदे करितसे ॥४॥ स्वयंपाकादिक करावयासी । लज्जा वाटतसे तयासी । तयाते एके समयासी । काय बोलती समर्थ ॥५॥ निर्लज्जासी सन्निध गुरु । असे जाण निरंतरु । ऐसे बोलता सद़्गुरु । बाळाप्पा मनी समजला ॥६॥ अनेक उपाये करोन । शुद्ध केले बाळाप्पाचे मन । स्वामीविणे दैवत अन्य । नसेचि थोर या जगी ॥७॥ सेवेकऱ्यांमाजी वरिष्ठ । सुंदराबाई होती तेथ । तिने सेवेकऱ्यास नित्य । त्रास द्यावा व्यर्थची ॥८॥ नाना प्रकारे बोलोन । करी सर्वांचा अपमान । परी बाळाप्पावरी पूर्ण । विश्वास होता तियेचा ॥९॥ परी कोणे एके दिवशी । मध्यरात्रीच्या समयासी । लघुशंका लागता स्वामींसी । बाळाप्पाते उठविले ॥१०॥ श्रींते धरोनिया करी । घेउनी गेले बाहेरी । पाहोनिया ऐशी परी । बाई अंतरी कोपली ॥११॥ म्हणे याने येवोन । स्वामी केले आपणा आधीन । माझे गेले श्रेष्ठपण । अपमान जाहला ॥१२॥ तैपासूनी बाळाप्पासी । त्रास देत अहर्निशी । गाऱ्हाणे सांगता समर्थांसी । बाईते शब्दे ताडिती ॥१३॥ अक्कलकोटी श्रीसमर्थ । प्रथमतः ज्याचे घरी येत । चोळाप्पा विख्यात । स्वामीभक्त जाहला ॥१४॥ एक तपपर्यंत । स्वामीसेवा तो करीत । तयासी द्रव्याशा बहुत । असे सांप्रत लागली ॥१५॥ दिवाळीचा सण येत । राजमंदिरामाजी समर्थ । राहिले असता आनंदात । वर्तमान वर्तले ॥१६॥ कोण्या भक्ते समर्थांसी । अर्पिले होते चंद्रहारासी । सणानिमित्त त्या दिवशी । अंगावरी घालावा ॥१७॥ राणीचिये मनांत । विचार येता त्वरित । सुंदराबाईसी लोबत । चंद्रहार द्यावा की ॥१८॥ सुंदराबाई बोलली । तो आहे चोळप्पाजवळी । ऐसे ऐकता त्या काळी । जमादार पाठविला ॥१९॥ गंगुलाल जमादार । चोळाप्पाजवळी ये सत्वर । म्हणे द्यावी जा चंद्रहार । राणीसाहेब मागती ॥२०॥ चोळाप्पा बोले तयांसी । हार नाही आम्हापासी । बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ॥२१॥ ऐसे ऐकुनी सत्वर । गंगुलाल जमादार । बाळाप्पाजवळी येउनी सत्वर । हार मागू लागला ॥२२॥ बाळाप्पा बोले सत्वर । आपणापासी चंद्रहार । परी चोळप्पाची त्यावर । सत्ता असे सर्वस्वे ॥२३॥ ऐसे ऐकुनी बोलणे । जमादार पुसे चोळाप्पाकारणे । जबाब दिधला चोळप्पाने । बाळाप्पा देती तरी घेईजे ॥२४॥ ऐसे भाषण ऐकोन । जमादार परतोन । नृपमंदिरी येवोन । वर्तमान सर्व सांगे ॥२५॥ चोळाप्पाची ऐकुन कृती । राग आला राणीप्रती । सुंदराबाईनेही गोष्टी । तयाविरुद्ध सांगितल्या ॥२६॥कारभार चोळाप्पाचे करी । जो होता आजवरी । तो काढूनी तयास दूरी । करावे राणी म्हणतसे ॥२७॥ पहिलेच होते बाईच्या मनी । साहाय्य झाली आता राणी । सुंदराबाईचा गगनी । हर्ष तेव्हा न समावे ॥२८॥ चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी । धनप्राप्ती तया भारी । समर्थकृपेने होतसे ॥२९॥ असो एके अवसरी । काय झाली नवलपरी । बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टीत ॥३०॥ एक वस्त्र तया वेळी । पडले होते श्रींजवळी । तयाची करोनिया झोळी । समर्थे करी घेतली ॥३१॥ अल्लख शब्द उच्चारिला । म्हणती भिक्षा द्या आम्हाला । तया वेळी सर्वत्राला । आश्चर्य वाटले ॥३२॥ झोळी घेतली समर्थे । काय असे उणे तेथे । जे जे दर्शना आले होते । त्यांनी भिक्षा घातली ॥३३॥ कोणी एक कोणी दोन । रुपये टाकती आणोन । न लागता एक क्षण । शंभरावर गणती झाली ॥३४॥ झोळी चोळाप्पाते देवोन । समर्थ बोले काय वचन । चोळाप्पा तुझे फिटले रीण । स्वस्थ आता बसावे ॥३५॥ पाहोनिया द्रव्यासी । आनंद झाला तयासी । परी न आले मानसी । श्रीचरण अंतरले ॥३६॥ तयासी झाले मास दोन । पुढे काय झाले वर्तमान । राणीच्या आज्ञेने शिपाई दोन । स्वामीजवळी पातले ॥३७॥ त्यांनी उठवून चोळाप्पासी । आपण बैसले स्वामीपाशी । चोळाप्पाच्या मानसी । दुःख फार जाहले ॥३८॥ स्वामीपुढे वस्तु येती । त्या शिपाई उचलिती । चोळाप्पाते काही न देती । ने तरी घेती हिरावोनी ॥३९॥ चोळाप्पासी दूर केले । बाईसी बरे वाटले । ऐसे काही दिवस गेले । बाळाप्पा सेवा करिताती ॥४०॥ कोणे एके अवसरी । सुंदराबाई बाळाप्पावरी । रागावोनी दृष्टोत्तरी । ताडण करी बहुसाळ ॥४१॥ ते ऐकोनी बाळाप्पासी । दुःख झाले मानसी । सोडून स्वामीचरणांसी । म्हणती जावे येथोनी ॥४२॥ ऐसा केला विचार । जाहली असता रात्र । बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर । खिन्न झाले मानसी ॥४३॥ आज्ञा समर्थांची घेवोनी । म्हणती जावे येथोनी । याकरिता दुसरे दिनी । समर्थांजवळी पातले ॥४४॥ आपुली आज्ञा घ्यावयासी । बाळाप्पा येतो या समयासी । अंतर्ज्ञानी समर्थांसी । तत्काळ विदित जाहले ॥४५॥ तेव्हा एक सेवेकऱ्यांस । बोलले काय समर्थ । बाळाप्पा दर्शनासी येत । त्यासी आसन दाखवावे ॥४६॥ बाळाप्पा येता त्या स्थानी । आसन दाविले सेवेकऱ्यांनी । तेव्हा समजले निजमनी । आज्ञा आपणा मिळेना ॥४७॥ कोठे मांडावे आसन । विचार पडला त्यालागून । तो त्याच रात्री स्वप्न । बाळाप्पाने देखिले ॥४८॥ श्रीमारुतीचे मंदिर । स्वप्नी आले सुंदर । तेथे जाउनी सत्वर । आसन त्यांनी मांडिले ॥४९॥ श्रीस्वामी समर्थ । या मंत्राचा जप करीत । एक वेळ दर्शना येत । हिशेब ठेवीत जपाचा ॥५०॥ काढूनी दिले बाळाप्पासी । आनंद झाला बाईसी । गर्वभरे ती कोणासी । मानीनाशी जाहली ॥५१॥ सुंदराबाईसी करावे दूर । समर्थांचा झाला विचार । त्याप्रमाणे चमत्कार । करोनिया दाविती ॥५२॥ जे कोणी दर्शना येत । त्यांसी बाई द्रव्य मागत । धन-धान्य साठवीत । ऐशा प्रकारे करोनी ॥५३॥ बाईची कृत्ये दरबारी । विदित केली थोर थोरी । बाईनी रहावे दूरी । श्रींचरणापासून ॥५४॥ परी राणीची प्रिती । बाईवरी बहू होती । याकारणे कोणाप्रती । धैर्य काही होईना ॥५५॥ अक्कलकोटी त्या अवसरी । माधवराव बर्वे कारभारी । तयांसी हुकूम झाला सत्वरी । बाईसी दूरी करावे ॥५६॥ परी राणीस भिवोनी । तैसे न केले तयांनी । समर्थ दर्शनासी एके दिनी । कारभारी पातले ॥५७॥ तयांसी बोलती समर्थ । कैसा करिता कारभार । ऐसे ऐकोनिया उत्तर । बर्वे मनी समजले ॥५८॥ मग त्यांनी त्याच दिवशी । पाठविले फौजदारासी । कैद करुनिया बाईसी । आणावी म्हणती सत्वर ॥५९॥ आज्ञेप्रमाणे सत्वर । बाईसी बांधी फौजदार । बाई करी शोक फार । घेत ऊर बडवूनी ॥६०॥ फौजदारासी समर्थ । काही एक न बोलत । कारकीर्दीचा अंत । ऐसा झाला बाईचा ॥६१॥ स्वामीचिया सेवेकरिता । सरकारांतूनी तत्त्वता । पंच नेमूनी व्यवस्था । केली असे नृपराये ॥६२॥ मग सेवा करावयासी । घेउनी गेले बाळाप्पासी । म्हणती देऊ तुम्हांसी । पगार सरकारांतूनी ॥६३॥ बाळाप्पा बोलले तयांसी । द्रव्याशा नाही आम्हांसी । आम्ही निर्लोभ मानसी । स्वामीसेवा करु की ॥६४॥ बाळाप्पाचा जप होता पूर्ण । एका भक्तास सांगोन । करविले श्रींनी उद्यापन । हिशेब जपाचा घेतला ॥६५॥ बाळाप्पांनी चाकरी । एक तप सरासरी । केली उत्तम प्रकारी । समर्था ते प्रिय जाहले ॥६६॥ अक्कलकोट नगरात । अद्यापि बाळाप्पा रहात । श्रीपादुकांची पूजा करीत । निराहार राहोनी ॥६७॥ जे जे झाली स्वामीभक्त । त्यात बाळाप्पा श्रेष्ठ । तयावरी श्री समर्थ । करीत होते प्रेम बहू ॥६८॥ ऐसे बाळाप्पाचे चरित्र । वर्णिले असे संकलित । स्वामी चरित्र सारामृत । चरित्रसार घेतले ॥६९॥ दृढनिश्चय आणि भक्ती । तैसी सद़्गुरुचरणी आसक्ति । तेणे येत मोक्ष हाती । अन्य साधने व्यर्थची ॥७०॥ दृढनिश्चयाचे उदाहरण । हे चरित्र असे पूर्ण । श्रोती होउनी सावधान । श्रवणी आदर धरावा ॥७१॥ उगीच करिती दांभिक भक्ती । त्यावरी स्वामी कृपा न करिती । सद़्भावे जे नमस्कारिती । त्यावरी होती कृपाळू ॥७२॥ पुढले अध्यायी सुंदर कथा । ऐका श्रोते देऊनी चित्ता । जेणे निवारे सर्व व्यथा । पापराशी दग्ध होती ॥७३॥ अक्कलकोटनिवासिया । जयजयाजी स्वामीराया । रात्रंदिन तुझ्या पाया । विष्णू शंकर वंदिती ॥७४॥ इति श्री स्वामी चरित्र । नाना प्राकृत कथा संमत । सदा भक्त परिसोत । त्रयोदशोऽध्याय गोड हा ॥७५॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
No comments:
Post a Comment