Tuesday, April 1, 2014

उद्धवाने उद्धार हा केला

आज चैत्र शुद्ध द्वितीया स्वामींचा प्रकटदिन.

इ.स १४५७ च्या दरम्यान श्रीनृसिंह सरस्वती गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन करून श्री शैल्य यात्रेला निघाले. आणि कर्दळी वनात गुप्त झाले. तिथे त्यांना समाधी लागली. तब्बल ३०० वर्ष समाधीवस्थेत असल्याने त्यांच्या भोवती मुंग्यांचे वारूळ निर्माण झाले होते. आता नवीन अवतार व्हावयाचा होता.नास्तिकांना आस्तीकतेचा मार्ग सुलभ करून द्यावयाचा होता.कर्मकांड,धर्मभोळेपणा,जातपातीची माणुसकीला लागलेली कसर दूर करावयाची होती. दुखी,गांजलेले तारावयाचे होते.
यासाठी निमित्त हवा होतं. निमित्त उद्धव लाकूडतोड्या झाला.


उद्धव लाकूडतोड्या कर्दळी वनात लाकडे जमवण्यासाठी आला होता.घनदाट कर्दळी वन, आज हि जिथे दिवसा संचार करण्यासाठी काळीज फाटते असे ते वन. तिथे असंख्य वारूळ होती. उद्धवास त्याचे नवल नव्हते,भीती नव्हती, एका झाडाची फांदी तोडत असताना त्याच्या हातातून कुर्हाड निसटली आणि बाजूच्या वारूळावर जाऊन पडली, निमित्त सध्या झाले होते, वारूळ भंगले त्यातून एक रक्ताची चीळकांडी बाहेर पडली, आणि त्यातून एक आजानुबाहू तेजस्वी दिव्य मूर्ती बाहेर पडली, तेज विलक्षण होते. उद्धव भयभित झाला, त्याला एका सज्जन साधूला दुखावल्याचा पश्चाताप वाटून तो माफी मागू लागला. पण दयाळू स्वामी समर्थांनी त्याला अभय दिले.तो कृतार्थ झाला.
खरं तर उद्धवाने आपला उद्धार केला.



स्वामी मग तिथून निघाले, संपूर्ण भारत भ्रमण करून अक्कलकोटी येऊन स्थिरावले.या काळात स्वामी चंचलभारती,नृसिंहभान,दिगंबर अशा नावाने जाणले जात होते.
स्वामी अक्कलकोट ला आले.२२ वर्षे वडाच्या झाडाखाली वास्तव्य करून अनेकांचा उद्धार केला.सन्मार्गावर आणले.
स्वामीचे हे २२ वर्षांचे वास्तव्य म्हणजे एक मोठा प्रवास होता, असंख्य अतर्क्य लीलांनी समृद्ध असा.
स्वामींच्या दरबारात राजे रंक एकसमान होते, जाती पातीचा,गरिबी श्रीमंतीचा भेदभाव नव्हता,कसला बाजार नव्हता,स्वामींना यथार्थ भाव पाहिजे होता,पेम पाहिजे होते,
भल्या-भल्यांना वठणीवर आणले,मनाच्या आंधळ्यांना दृष्टी दिली,कल्मिष्ठाचे कुष्ठ घालवले, ईर्षेचा पोटशूळ बरा केला,आळश्यांना कष्टाचे महत्व समजावून दिले,वासनेचा ताप उतरवला, आजही स्वामी भरकटलेल्यांना मार्गावर आणण्याची कृपा करत आहेत. स्वामींना कोणत्याही संकटात साद घाला,प्रेमाने करुणेने आळवा, स्वामींनी दुसर्याच क्षणी तुमचा मार्ग सुलभ बनवून आलेले संकट परतवून लावले नाही असे कधीच झाले नाही. त्या माऊलीला तिच्या लेकारांविषयी भलताच कनवळा आहे, ती भक्त वत्सल आहे, भक्ताचे रक्षण करण्यात तिचे समाधान आहे. ज्यांनी आयुष्यात कुत्सितपणाने का होईना पण एकदा तरी श्री स्वामी समर्थांचे नाव घेतले आहे त्याची नाव पैलतीरावर लागलीच समजा,स्वामींची सेवा करणे म्हणजे शतजन्माची पुण्याई असावी.
अक्कलकोटी या, प्रेमाने दर्शन घ्या, तिथेच तुम्हाला समाधानाचा उगम होईल.मनातील कल्मिष्ठ विरून जाईल,
आणि आपसूक च समर्थांचा धावा तुमचे मन करू लागेल.

||श्री स्वामी समर्थ|| ||जय जय स्वामी समर्थ||

स्वामींचा प्रकटदिनोत्सव दिनांक ०१.०४.२०१४ चैत्र शुद्ध द्वितीया ठीकठिकाणी स्वामींच्या मठामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
कित्येकांचा बेडा पार झालाय स्वामी नामाने,
नवीन वर्ष आहे.
स्वामींचे नाव घेऊन आपले जीवन समृद्ध करता करता इतरांना सुद्धा सन्मार्गावर आणण्याचा संकल्प करूया.
पणतीने पणती लावूया.
||श्री स्वामी समर्थ||
||जय जय स्वामी समर्थ||

No comments:

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||