श्री स्वामी समर्थांची सत्ता या अखिल ब्रह्मांडावर आहे. सकळ प्राणीमात्रांमध्ये चैतन्य श्री स्वामींमुळे आहे.असा स्वमिभाक्तांचा ठाम विश्वास आहे. आणि त्याची प्रचीती त्यांना येतेच. स्वामींचे प्राण्यांवर खूप प्रेम होते.त्यांच्या सानिध्यात गायी,बैल,घोडे,कुत्रे नेहमीच असायचे. स्वामींना त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा होता.त्यांना ते प्रेमाने भरवत, त्यांच्या पाठीवरून हात फिरवत. निर्वाण समयी स्वामींनी सेवेकर्यांना आज्ञा केली होती कि सर्व जनावरांना मज जवळ आणा.
स्वामींनी त्यांच्या अंगावर आपल्या शाली, छाट्या टाकल्या होत्या,खूप प्रेमाने आणि करुणेने त्यांच्या अंगावरून हात फिरवला होता. आणि कसे काय कुणास ठाऊक त्या मुक्या जनावरांना सुद्धा कळले होते कि स्वामी आता जाणार. गायी वासरांच्या, घोड्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते.गायी हंबरडा फोडत होत्या.