Monday, March 3, 2014

अध्याय ११

परम पूज्य बाळाप्पा महाराज 
। श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ मागले अध्यायी वर्णिले । बाळाप्पा मुरगोडी आले । पुण्यस्थानी राहिले । तीन रात्री आनंदे ॥१॥ तेथे कळला वृतान्त । अक्कलकोटी साक्षात । यतिरुपे श्रीदत्त । वास्तव्य सांप्रत करिताती ॥२॥ तेथे आपुला मनोदय । सिद्धीस जाईल निःसंशय । फिटेल सर्वही संदेह । श्री सद़्गुरुकृपेने ॥३॥ परी मुरगोडीचे विप्र । बाळाप्पासी सांगत । गाणगापूर विख्यात । महाक्षेत्र भीमातीरी ॥४॥ तेथे आपण जावोनी । बैसावे हो अनुष्ठानी । श्रीगुरु स्वप्नी येवोनी । सांगती तैसे करावे ॥५॥ मानला तयासी विचार । निघाले तेथूनी सत्वर । जवळी केले गाणगापूर । परम पावन स्थान ते ॥६॥ कामना धरोनी चित्ती । सेवेकरी सेवा करिती । जेथे वाहे भीमा नदी । स्नान करिती भक्तजन ॥७॥ पुत्रकामना धरुनी चित्ती । आराधिती नृसिंहसरस्वती । दरिद्री धन इच्छिती । रोगीजन आरोग्य ॥८॥ कोणी घालिती प्रदक्षिणा । कोणी ब्राह्मणभोजना । कोणी करिती गंगास्नाना । कोणी घालिती नमस्कार ॥९॥ तेथील सर्व सेवेकरी । नित्य नियमे दोन प्रहरी । मागोनिया मधुकरी । निर्वाह करिती आपुला ॥१०॥ बाळाप्पा तेथे पातले । स्थान पाहोनी आनंदले । नृसिंहसरस्वती पाऊले । प्रेमभावे वंदिली ॥११॥ प्रातःकाळी उठोनी । संगमावरी स्नान करोनी । जप ध्यान आटपोनी । मागुनी येती गावात ॥१२॥ सेवेकऱ्यांबरोबरी । मागोनिया मधुकरी । भोजनोत्तर संगमावरी । परतोनि येती ते ॥१३॥ माध्यान्ह स्नान करोनी । पुन्हा बैसली जप ध्यानी । अस्ता जाता वासरमणी । संध्यास्नान करावे ॥१४॥ करोनिया संध्यावंदन । जप आणि नामस्मरण । रात्र पडता परतोन । ग्रामामाजी येती ते ॥१५॥ बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी । संतती संपत्ती सर्व सदनी । परान्न ठावे नसे स्वप्नी । सांप्रत भिक्षा मागती ॥१६॥ सद़्गुरुप्राप्तीकरिता । सोडूनी गृह-सुत-कांता । शीतोष्णाची पर्वा न करिता । आनंदवृत्ती राहती ॥१७॥ पंचपक्वान्ने सेविती घरी । येथे मागती मधुकरी । मिळती कोरड्या भाकरी । उदर पूर्ती न होय ॥१८॥ शीतोष्णाचा होय त्रास । अर्धपोटी उपवास । परी तयांचे मानस । कदा उदास नोहेची ॥१९॥ अय्याराम सेवेकरी । राहत होते गाणगापुरी । त्यांनी देखुनी ऐसीपरी । बाळाप्पासी बोलती ॥२०॥ तुम्ही भिक्षा घेवोनी । नित्य यावे आमुच्या सदनी । जे जे पडेल तुम्हांस कमी । ते ते आम्ही पुरवू जी ॥२१॥ बाळाप्पासी मानवले । दोन दिवस तैसे केले । पोटभरोनी जेवले । परी संकोच मानसी ॥२२॥ जाणे सोडिले त्यांचे घरी । मागोनिया मधुकरी । जावोनिया संगमावरी । झोळी उदकी बुडवावी ॥२३॥ आणोनिया बाहेरी । बैसोनी तिथे शिळेवरी । मग खाव्या भाकरी । ऐसा नेम चालविला ॥२४॥ ऐसे लोटले काही दिवस । सर्व शरीर झाले कृश । निशिदीनी चिंता चित्तास । सद़्गुरुप्राप्तीची लागली ॥२५॥ घरदार सोडिले । वनिता पुत्रा त्यागिले । अतितर कष्ट सोशिले । सद़्गुरुकृपा नोहेची ॥२६॥ हीन आपुले प्राक्तन । भोग भोगवी दारुण । पहावे सद़्गुरुचरण । ऐसे पुण्य नसेची ॥२७॥ ऐसे विचार निशिदीनी । येती बाळाप्पाचे मनी । तथापि कष्ट सोसोनी । नित्य नेम चालविला ॥२८॥ एक मास होता निश्चिती । स्वप्नी तीन यतिमूर्ती । येवोनिया दर्शन देती । बाळाप्पा चित्ती सुखावे ॥२९॥ पंधरा दिवस गेल्यावरी । निद्रिस्त असता एके रात्री । एक ब्राह्मण स्वप्नाभीतरी । येवोनिया आज्ञापी ॥३०॥ अक्कलकोटी श्रीदत्त । स्वामीरुपे नांदत । तेथे जाऊनी त्वरित । कार्य इच्छित साधावे ॥३१॥ पाहोनिया ऐसे स्वप्न । मनी पावले समाधान । म्हणती केले कष्ट दारुण । त्याचे फळ मिळेल की ॥३२॥ अक्कलकोटी त्वरीत । जावयाचा विचार करीत । तव तयासी एक पत्र । शय्येखाली सापडले ॥३३॥ त्यात लिहिली एक ओळी । करु नये उतावळी । ऐसे पाहूनी त्या वेळी । विचार केला मानसी ॥३४॥ आपण केले अनुष्ठान । परी ते जाहले अपूर्ण । आणखीही काही दिन । क्रम आपुला चालवावा ॥३५॥ मग कोणे एके दिवशी । बाळाप्पा आले संगमासी । वृक्षातळी ठेवून वस्त्रासी । गेले स्नान करावया ॥३६॥ परतले स्नान करोनि । सत्वर आले त्या स्थानी । वस्त्र उचलिता खालोनी । वृश्चिक एक निघाला ॥३७॥ तयासी त्यांनी न मारिले । नित्यकर्म आटोपिले । ग्रामामाजी परत आले । गेले भिक्षेकारणे ॥३८॥ त्या दिवशी ग्रामाभीतरी । पक्वान्न मिळाले घरोघरी । बाळाप्पा तोषले अंतरी । उत्तम दिन मानिला ॥३९॥ अक्कलकोटी जावयासी । निघाले मग त्याच दिवशी । उत्तम शकुन तयांसी । मार्गावरी जाहले ॥४०॥ चरण-चाली चालोनी । अक्कलकोटी दुसरे दिनी । बाळाप्पा पोचले येवोनी । नगरी रम्य देखिली ॥४१॥ जेथे नृसिंहसरस्वती । यतिरुपे वास करिती । तेथे सर्व सौख्ये नांदती । आनंद भरला सर्वत्र ॥४२॥ तया नगरीच्या नारी । कामधंदा करिता घरी । गीत गाउनी परोपरी । स्वामीमहिमा वर्णिती ॥४३॥ दूर देशीचे ब्राह्मण । वैश्यादिक इतर वर्ण । स्वामीमहिमा ऐकोन । दर्शनाते धावती ॥४४॥ तयांची जाहली गर्दी । यात्रा उतरे घरोघरी । नामघोषे ते नगरी । रात्रंदिन गजबजे ॥४५॥ राजे आणि पंडित । शास्त्री वेदांती येत । तैसे भिक्षुक गृहस्थ । स्वामीदर्शनाकारणे ॥४६॥ कानफाटे नाथपंथी । संन्यासी फकीर यती । रामदासी अघोरपंथी । दर्शना येती स्वामींच्या ॥४७॥ कोणी करिती कीर्तन । गायन आणि वादन । कोणी भजनी नाचोन । स्वामीमहिमा वर्णिती ॥४८॥ तया क्षेत्रीच महिमान । केवी वर्णू मी अज्ञान । प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन । स्वामीकृपेने जाहले ॥४९॥ पुण्यपावन देखोन नगरी । बाळाप्पा तोषले अंतरी । पूर्वपुण्य तयांचे पदरी । जन्मसार्थक जाहले ॥५०॥ बाळाप्पा होउनी सेवेकरी । स्वहस्ते करील श्रीचाकरी । ती मधुर कथा चतुरी । पुढील अध्यायी परिसावी ॥५१॥ जयाचा महिमा अगाध । जो केवळ सच्चिदानंद । विष्णूशंकरी अभेद । मित्रत्व ठेवो जन्मवरी ॥५२॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । श्रोते सदा परिसोत । एकादशोऽध्याय गोड हा ॥५३॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
)

Sunday, March 2, 2014

अध्याय १२

। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय ।





॥ श्री गणेशाय नमः ॥ करावया जगदुद्धार । हरावया भूभार । वारंवार परमेश्वर । नाना अवतार धरितसे ॥१॥ भक्तजन तारणार्थ । अक्कलकोटी श्रीदत्त । यतिरुपे प्रगट होत । तेची समर्थ श्रीस्वामी ॥२॥ गताध्यायाचे अंती । बाळाप्पा आले अक्कलकोटी । पुण्यनगर पाहोनी दृष्टी । आनंद पोटी नच मावे ॥३॥ त्या दिवशी श्री समर्थ । होते खासबागेत । यात्रा आली बहुत । गर्दी झाली श्रींजवळी ॥४॥ बाळाप्पाचे मानसी । तेव्ही चिंता पडली ऐशी । ऐशा गर्दीत आपणासी । दर्शन कैसे होईल ॥५॥ परी दर्शन घेतल्याविण । आज करु नये भोजन । बाळाप्पाचे तनमन । स्वामीचरणी लागले ॥६॥ दर्शनेच्छा उत्कट चित्ती । खडीसाखर घेवोनी हाती । गर्दीमाजी प्रवेश करिती । स्वामी सान्निध पातले ॥७॥ आजानुबाहू सुहास्यवदन । श्रीस्वामीमूर्ती पाहोन । बाळाप्पाने धावोन । दृढ चरण धरियेले ॥८॥ कंठ सद़्गदित जाहला । चरणी भाळ ठेविला । क्षणैक मीपण विसरला । परम तोषला मानसी ॥९॥ गंगा मिनली सागरी । जैसे तरंग जलाभीतरी । तैसे बाळाप्पा ते अवसरी । स्वामीचरणी दृढ झाले ॥१०॥ मधुस्तव भ्रमर जैसा । कमलपुष्प न सोडी सहसा । स्वामीचरणी बाळाप्पा तैसा । दृढ जडला स्वभावे ॥११॥ येवोनिया भानावरती । श्रीचरणांची सोडिली मिठी । ब्रह्मानंद न मावे पोटी । स्तोत्र ओठी गातसे ॥१२॥ श्री स्वामी समर्थ त्या वेळी । पडले होते भूतळी । उठोनिया काय केली । लीला एक विचित्र ॥१३॥ सर्व वृक्षांसी आलिंगन । दिले त्यांनी प्रेमेकरोन । बाळाप्पावरचे प्रेम । ऐशी कृतीने दाविले ॥१४॥ धन्यता मानोनी मनी । बाळाप्पा निघाले तेथोनी । परी तयांचे श्रीचरणी । चित्त गुंतले अखंड ॥१५॥ त्यासवे एक जहागिरदार । ते होते बिऱ्हाडावर । स्वयंपाक करोनी तयार । म्हणती जाऊ दर्शना ॥१६॥ बाळाप्पा दर्शन करोन । आले बिऱ्हाडी परतोन । जहागिरदारे नैवेद्य काढोन । बाळाप्पा हाती दिधला ॥१७॥ म्हणती जाउनी स्वामींसी । अर्पण करा नैवेद्यासी । अवश्य म्हणोनी तयांसी । बाळाप्पा तेव्हा चालले ॥१८॥ म्हणती नैवेद्य दाखवून । मग करु प्रसाद भक्षण । मार्गी तयांसी वर्तमान । विदीत एक जाहले ॥१९॥ या समयी श्री समर्थ । असती नृप मंदिरात । राजाज्ञेवाचूनी तेथ । प्रवेश कोणाचा न होय ॥२०॥ ऐसे ऐकूनी वर्तमान । बाळाप्पा मनी झाले खिन्न । म्हणती आज नैवेद्यार्पण । आपल्या हस्ते नोहेची ॥२१॥ मार्गावरुनी परतले । सत्वर बिऱ्हाडावरती आले । तेथे नैवेद्यार्पण केले । मग सारिले भोजन ॥२२॥ नित्य प्रातःकाळी उठोन । षट्कर्मांते आचरोन । घेवोनी स्वामी दर्शन । जपालागी बैसावे ॥२३॥ श्री शंकर उपास्य दैवत । त्याचे करावे पूजन नित्य । माध्यान्ही येता आदित्य । जपानुष्ठान आटपावे ॥२४॥ करी झोळी घेवोनी । श्री स्वामींजवळी येवोन । मस्तक ठेवोनी चरणी । जावे भिक्षेकारणे ॥२५॥ मागोनिया मधुकरी । मग यावे बिऱ्हाडावरी । जी मिळेल भाजीभाकरी । त्याने पोट भरावे ॥२६॥ घ्यावे स्वामी दर्शन । मग करावे अनुष्ठान । ऐशा प्रकारे करोन । अक्कलकोटी राहिले ॥२७॥ चोळाप्पा आदीकरोन । सेवेकरी बहुतजण । त्यांत सुंदराबाई म्हणून । मुख्य होती त्या वेळी ॥२८॥ आपण व्हावे सेवेकरी । इच्छा बाळाप्पाचे अंतरी । सुंदराबाईचिये करी । आधिपत्य सर्व असे ॥२९॥ एके दिवशी तयासी । बाई आज्ञा करी ऐशी । आपणही श्रीसेवेसी । करीत जावे आनंदे ॥३०॥ बाळाप्पा मनी आनंदला । म्हणे सुदिन आज उगवला । सद़्गुरुसेवेचा लाभ झाला । जाहले सार्थक जन्माचे ॥३१॥ बहुत जण सेवेकरी । बाई मुख्य त्यांमाझारी । सर्व अधिकार तिच्या करी । व्यवस्थेचा होता पै ॥३२॥ मी प्रिय बहु स्वामींसी । ऐसा अभिमान तियेसी । गर्वभरे इतरांसी । तुच्छ मानू लागली ॥३३॥ या कारणे आपसात । भांडणे होती सदोदित । स्वामीसेवेची तेथ । अव्यवस्था होतसे ॥३४॥ हे बाळाप्पांनी पाहोन । नाना युक्ती योजून । मोडुनि टाकिले भांडण । एकचित्त सर्व केले ॥३५॥ कोठेही असता समर्थ । पूजादिक व्हावया यथार्थ । तत्संबंधी सर्व साहित्य । बाळाप्पा सिद्ध ठेविती ॥३६॥ समर्थांच्या येता चित्ती । अरण्यांतही वस्ती करिती । परी तेथेही पूजा आरती । नियमे करिती बाळाप्पा ॥३७॥ बाळाप्पांची प्रेमळ भक्ती । पाहुनी संतोष स्वामीप्रती । दृढ भाव धरुनी चित्ती । सेवा करिती आनंदे ॥३८॥ ऐसे लोटता काही दिवस । बाळाप्पाचिया शरीरास । व्याधी जडली रात्रंदिवस । चैन नसे क्षणभरी ॥३९॥ बेंबीमधूनिया रक्त । वहातसे दिवसरात्र । तया दुःखे विव्हळ होत । म्हणती कैसे करावे ॥४०॥ भोग भोगिला काही दिन । कागदाची पुडी बेंबीतून । पडली ती पाहता उकलोन । विष त्यात निघाले ॥४१॥ पूर्वी कोण्या कृतघ्ने । बाळाप्पासी यावे मरण । विष दिधले कानोल्यातून । पडले आज बाहेर ॥४२॥ स्वामीकृपेने आजवरी । गुप्त राहिले होते उदरी । सद़्गुरुसेवा त्यांचे करी । व्हावी लिखित विधीचे ॥४३॥ आजवरी बहुतापरी । बाळाप्पा करी चाकरी । तयाचे अंतर परी । स्वामीमय न जाहले ॥४४॥ प्रत्येक सोमवारी तयांनी । महादेवांची पूजा करोनी । मग यावे परतोनी । स्वामीसेवेकारणे ॥४५॥ हे पाहोनी एके दिवशी । बाई विनवी समर्थांसी । आपण सांगुनी बाळाप्पासी । शंकरपूजनी वर्जावे ॥४६॥ तैशी आज्ञा तयाप्रती । एके दिनी समर्थ करिती । परी बाळाप्पाचे चित्ती । विश्वास काही पटेना ॥४७॥ बाईच्या आग्रहावरुन समर्थे दिली आज्ञा जाण । हे नसेल सत्य पूर्ण । विनोद केला निश्चये ॥४८॥ पूजा करणे उचित । न करावी हेचि सत्य । यापरी चिठ्ठ्या लिहित । प्रश्न पाहत बाळाप्पा ॥४९॥ एक चिठ्ठी तयातून । उचलुनी पाहता वाचून । न करावेची पूजन । तयामाजी लिहिलेसे ॥५०॥ तेव्हा सर्व भ्रांती फिटली । स्वामी आज्ञा सत्य मानिली । ही भानगड पाहिली । श्रीपाद भटजीने ॥५१॥ समर्थांचा पूर्ण भक्त । चोळाप्पा नामे विख्यात । तयाचा हा जामात । श्रापादभट्ट जाणिजे ॥५२॥ स्वामीपुढे भक्तजन । ठेविती द्रव्यादिक आणोन । ते सुंदराबाई उचलोन । नेत असे सत्वर ॥५३॥ त्यामुळे चोळप्पाप्रती । अल्प होई द्रव्यप्राप्ती । बाळाप्पामुळे म्हणती । नुकसान होते आपुले ॥५४॥ तेव्हा जामात श्वशुर । उभयतां करिती विचार । बाळाप्पाते आता दूर । केले पाहिजे युक्तीने ॥५५॥ श्रीपादभट्ट एके दिवशी । काय बोलती बाळाप्पासी । दारापुत्र सोडुनी देशी । आपण येथे राहिला ॥५६॥ आपण आल्यापासोन । आमुचे होते नुकसान । ऐसे बोल ऐकोन । बाळाप्पा मनी खिन्न झाला ॥५७॥ बाळाप्पा बोले वचन । तुमचे अन्न खावोन । करितो तुमचे नुकसान । व्यर्थ माझा जन्म हा ॥५८॥ स्वामींनी मज आज्ञा द्यावी । मी जातो आपुल्या गावी । परी तुम्ही युक्ती योजावी । आज्ञा होईल ऐशीच ॥५९॥ श्रीपादभट्टे एके दिवशी । विचारले समर्थांसी । कुलदेवतेच्या दर्शनासी । जावया इच्छी बाळाप्पा ॥६०॥ ऐसे ऐकुनिया समर्थ । हास्यमुखे काय बोलत । कुलदेवतेचे दर्शननित्य । बाळाप्पा येथे करीत असे ॥६१॥ तेव्हा निरुत्तर जाहला । ऐसा उपाय खुंटला । मग तयाने पाहिला । कारभार चिठ्ठ्यांचा ॥६२॥ तयाने पुसिले वर्तमान । बाळाप्पा सांगे संपूर्ण । श्रीपादभट्टे ऐकोन । कापट्य मनी आणिले ॥६३॥ म्हणे जावया आपणासी । समर्थ न देती आज्ञेसी । तरी टाकून चिठ्ठ्यांसी । आज्ञा घ्यावी आपण ॥६४॥ तयांचे कपट न जाणोनी । अवश्य म्हणे त्याच दिनी । दोन चिठ्ठ्या लिहोनी । उभयतांसी टाकिल्या ॥६५॥ चिठ्ठी आपुल्या करी । भटजी उचली सत्वरी । येथे राहूनी चाकरी । करी ऐसे लिहिलेसे ॥६६॥ भटजी मनी खिन्न झाला । सर्व उपाय खुंटला । महाराज आता बाळाप्पाला । न सोडतील निश्चये ॥६७॥ स्वामी चरणी दृढ भक्ती । बाळाप्पाची जडली होती । कैसा दूर तयाप्रती । करितील यती दयाळ ॥६८॥ जो केवळ दयाधन । भक्तकाजकल्पद्रुम । विष्णू शंकर दोघेजण । तयांसी शरण सदैव ॥६९॥ इति श्री स्वामी चरित्र । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत । द्वादशोऽध्याय गोड हा ॥७०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
)
|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||