Showing posts with label श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. Show all posts
Showing posts with label श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. Show all posts

Friday, March 14, 2014

श्री स्वामी समर्थ

||श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 


विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत हा २१ अध्यायी प्रासादिक पारायण ग्रंथ लिहिला. विष्णू बुवांचा जन्म रत्नागिरीतील पालशेत मध्ये झाला.व्यवसायाने ते शिक्षक होते.पुढे कुणी शंकर शेट नावाच्या मारवाडी स्वामीभक्त स्नेह्यामुळे विष्णुबुवा सुद्धा स्वामी भक्ती करू लागले. आणि कोणतीही काव्य शक्ती नसताना त्यांनी स्वामीचरित्र सारामृत लिहिले.
आज हा प्रासादिक ग्रंथ गेली कित्येक दशके लाखो घरात पुजला जातो, भजला जातो, अनेक भाविक, आबालवृद्ध या ग्रंथाचे प्रेमाने पारायण करून स्वामींची सेवा करत आहेतस्वामींनी त्यांना पाऊलो-पाऊली प्रचीती दिली आहे आणि देत राहतील. आणि भक्तवत्सल भक्ताभिमानी हे विशेषण अजून दृढ करतील
पारायण सुलभ पद्धतीने करता येते.रोज ,,,२१ अशा अंकामध्ये अध्याय वाचता येतात. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये एक अध्याय जरी वाचला,इतकी सेवा सुद्धा स्वामींपर्यंत पोहोचली जाते. ओवीबद्ध रचना, स्वामींच्या लीलांचे अद्भुत वर्णन यामुळे हा ग्रंथ वाचता वाचता भाविक तल्लीन होऊन जातात
आपण सुद्धा या पवित्र ग्रंथाचे पारायण करून आपल्या या व्याप युक्त जीवनात समाधान आणूया आणि स्वामींची सेवा करूया
स्वामी हजार हातांनी देताहेत, पण घेणार्याचे हात मात्र दोन आणि दिलेले साठवण्यासाठी मनाची खोली मात्र संकुचित आहे
।।श्री स्वामी समर्थ।।


Thursday, March 13, 2014

अध्याय १

। श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥ श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।भावातीतं त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥जयजय श्री जगरक्षका । जयजयाजी भक्तपालका । जयजय कलिमलनाशका । अनादिसिद्धा जगद्गुरु ॥१॥ जयजय क्षीरसागर विलासा । मायाचक्रचालका अविनाशा । शेषशयना अनंतवेषा । अनामातीता अनंता ॥२॥ जयजयाजी गरुडवाहना । जयजयाजी कमललोचना । जयजयाची पतितपावना । रमारमणा विश्वेशा ॥३॥ मेघवर्ण आकार शांत । मस्तकी किरीट विराजित । तोच स्वयंभू आदित्य । तेज वर्णिले न जाय ॥४॥ विशाळ भाळ आकर्ण नयन । सरळ नासिका सुहास्य वदन । दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान । शुभ्रवर्ण विराजती ॥५॥ रत्नमाला हृदयावरी । जे कोटी सूर्यांचे ते हरी । हेममय भूषणे साजिरी । कौस्तुभमणि विशेष ॥६॥ वत्सलांच्छनाचे भूषण । चेति प्रेमळ भक्तिची खूण । उदरी त्रिवळी शोभायमान । त्रिवेणीसंगमासारखी ॥७॥ नाभिकमल सुंदर अति । जेथे विधात्याची उत्पत्ती । की चराचरा जन्मदाती । मूळ चननी तेचि पै ॥८॥ जानूपर्यंत कर शोभति । मनगटी कंकणे विराजती । करकमलांची आकृति । रक्तपंकजासमान ॥९॥ भक्ता द्यावया अभय वर । सिद्ध सर्वदा सव्य कर । गदा पद्म शंख चक्र । चार हस्ती आयुधे ॥१०॥ कांसे कसिला पीतांबर । विद्युल्लतेसम तेज अपार । कर्दळीस्तंभापरी सुंदर । उभय जंघा दिसताती ॥११॥ जेथे भक्तजन सुखावती । ज्याच्या दर्शने पतीत तरती । ज्याते अहोरात्र ध्याती । नारदादि ऋषिवर्य ॥१२॥ ज्याते कमला करे चुरीत । संध्यारागा समान रक्त । तळवे योग्य चिन्हे मंडित । वर्णित वेद शीणले ॥१३॥ चौदा विद्या चौसष्ट कला । ज्याते वर्णित थकल्या सकळा । ऐशा त्या परम मंगला । अल्पमती केवि वर्णू ॥१४॥ नारदादि मुनीश्वर । व्यास वाल्मिकादि कविवर । लिहू न शकले महिमांवर । तेथे पामर मी काय ॥१५॥ जो सकळ विश्वाचा जनिता । समुद्रकन्या ज्याची कांता । जो सर्व कारण कर्ता । ग्रंथारंभी नमू तया ॥१६॥ त्या महाविष्णूचा अवतार । गजवदन शिवकुमार । एकदंत फरशधर । अगम्य लीला जयांची ॥१७॥ जो सकळ विद्यांचा सागर । चौसष्ट कलांचे माहेर । रिद्धि सिद्धीचा दातार । भक्त पालक दयाळू ॥१८॥ मंगल कार्या करिता स्मरण । विघ्नें जाती निरसोन । भजका होई दिव्य ज्ञान । वेदांतसार कळे पां ॥१९॥ सकल कार्यारंभी जाणा । करिती ज्याच्या नामस्मरण । ज्याच्या वरप्रसादे नाना । ग्रंथरचना करिती कवी ॥२०॥ तया मंगलासी साष्टांग नमन । करूनी मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । निर्विघ्नपणे होवो हे ॥२१॥ जिचा वरप्रसाद मिळता । मूढ पंडित होती तत्त्वता । सकळ काव्यार्थ येत हाता । ती ब्रह्मसुता नमियेली ॥२२॥ मूढमती ती अज्ञान । काव्यादिकांचे नसे ज्ञान । माते तू प्रसन्न होवोन । ग्रंथरचना करवावी ॥२३॥ जो अज्ञानतिमिरनाशक । अविद्याकाननच्छेदक । जो सद़्बुद्धीचा प्रकाशक । विद्यादायक गुरुवर्य ॥२४॥ ज्याचिया कृपेकरोन । सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान । तेणेच जगी मानवपण । येतसे की निश्चये ॥२५॥ तेवी असता मातापितर । तैसेचि श्रेष्ठ गुरुवर्य । चरणी त्यांचिया नमस्कार । वारंवार साष्टांग ॥२६॥ मी मतिमंद अज्ञ बाळ । घेतली असे थोर आळ । ती पुरविणार दयाळ । सद़्गुरुराज आपणची ॥२७॥ नवमास उदरी पाळिले । प्रसववेदनांते सोशिले । कौतुके करूनी वाढविले । रक्षियेले आजवरी ॥२८॥ जननीजनका समान । अन्य दैवत आहे कोण । वारंवार साष्टांग नमन । चरणी तयांच्या करीतसे ॥२९॥ ब्रम्हा विष्णू महेश्वर । तिन्ही देवांचा अवतार । लीलाविग्रही अत्रिकुमार । दत्तात्रेय नमियेला ॥३०॥ तीन मुखे सहा हात । गळा पुष्पमाळा शोभत । कर्णी कुंडले तेज अमित । विद्युल्लतेसमान ॥३१॥ कामधेनू असोनि जवळी । हाती धरिली असे झोळी । जो पहाता एका स्थळी । कोणासही दिसेना ॥३२॥ चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ॥३३॥ त्या परब्रम्हासी नमन । करोनि मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । होवो कृपेने आपुल्या ॥३४॥ वाढला कलीचा प्रताप । करू लागले लोक पाप । पावली भूमि संताप । धर्मभ्रष्ट लोक बहू ॥३५॥ पहा कैसे दैव विचित्र । आर्यावर्ती आर्यपुत्र । वैभवहीन झाले अपार । दारिद्र्य, दुःखे भोगिती ॥३६॥ शिथिल झाली धर्मबंधने । नास्तिक न मानिती वेदवचने । दिवसेंदिवस होमहवने । कमी होऊ लागली ॥३७॥ सुटला धर्माचा राजाश्रय । अधर्मप्रवर्तका नाही भय । उत्तरोत्तर नास्तिकमय । भरतखंड जाहले ॥३८॥ नाना विद्या कला । अस्तालागी गेल्या सकला । ऐहिक भोगेच्छा बळावल्या । तेणे सुटला परमार्थ ॥३९॥ धर्मसंस्थापनाकारणे । युगायुगी अवतार घेणे । नानाविध वेष नटणे । जगत्पतीचे कर्तव्य ॥४०॥ लोक बहु भ्रष्ट झाले । स्वधर्माते विसरले । नास्तिकमतवादी मातले । आर्यधर्माविरुद्ध ॥४१॥ मग घेतसे अवतार । प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार । अक्कलकोटी साचार । प्रसिद्ध झाला स्वामीरुपे ॥४२॥ कोठे आणि कोणत्या काळी । कोण्या जातीत कोणत्या कुळी । कोण वर्णाश्रम धर्म मुळी । कोणासही कळेना ॥४३॥ ते स्वामी नामे महासिद्ध । अक्कलकोटी झाले प्रसिद्ध । चमत्कार दाविले नानाविध । भक्त मनोरथ पुरविले ॥४४॥ त्यांसी साष्टांग नमोनी । करी प्रार्थना कर जोडोनी । आपुला विख्यात महिमा जनी । गावयाचे योजिले ॥४५॥ तुमचे चरित्र महासागर । पावेन कैसा पैलतीर । परि आत्मसार्थक करावया साचार । मीन तेथे जाहलो ॥४६॥ किंवा अफाट गगनासमान । अगाध आपुले महिमान । अल्पमती मी अज्ञान । आक्रमण केवी करू ॥४७॥ पिपीलिक म्हणे गिरीसी । उचलून घालीन काखेसी । किंवा खद्योत सूर्यासी । लोपवीन म्हणे स्वतेजे ॥४८॥ तैसी असे माझी आळ । बाळ जाणूनी लडिवाळ । पुरविता तु दयाळ । दीनबंधू यतिवर्या ॥४९॥ कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥५०॥ ऐसी ऐकुनिया स्तुती । संतोषली स्वामीराजमूर्ति । कविलागी अभय देती । वरदहस्ते करोनी ॥५१॥ उणे न पडे ग्रंथांत । सफल होतील मनोरथ । पाहूनी आर्यजन समस्त । संतोषतील निश्चये ॥५२॥ ऐसी ऐकोनि अभयवाणी । संतोष झाला माझिया मनी । यशस्वी होवोनी लेखणी । ग्रंथसमाप्तीप्रति होवो ॥५३॥ आतां नमू साधुवृंद । ज्यासी नाही भेदाभेद । ते स्वात्मसुखी आनंदमय । सदोदित राहती ॥५४॥ मग नमिले कविश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर । ज्यांची काव्ये सर्वत्र । प्रसिद्ध असती या लोकी ॥५५॥ व्यास वाल्मिक महाज्ञानी । बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी । वारंवार तयांच्या चरणी । नमन माझे साष्टांग ॥५६॥ कविकुलमुकुटावतंस । नमिले कवि कालिदास । ज्यांची नाट्यरचना विशेष । प्रिय जगी जाहली ॥५७॥ श्रीधर आणि वामन । ज्यांची ग्रंथरचना पाहोन । ज्ञातेही डोलविती मान । तयांचे चरण नमियेले ॥५८॥ ईशचरणी जडले चित्त । ऐसे तुकारामादिक भक्त । ग्रंथारंभी तया नमित । वरप्रसादाकारणे ॥५९॥ अहो तुम्ही संत जनी । मज दीनावरी कृपा करोनी । आपण हृदयस्थ राहोनी । ग्रंथरचना करवावी ॥६०॥ आता करू नमन । जे का श्रोते विलक्षण । महाज्ञानी आणि विद्वान । श्रवणी सादर बैसले ॥६१॥ महापंडित आणि चतुर । ऐसा श्रोतृसमाज थोर । मतिमंद मी त्यांच्यासमोर । आपले कवित्व केवी आणू ॥६२॥ परी थोरांचे लक्षण । एक मला ठाउके पूर्ण । काही असता सद्गुण । आदर करिती तयाचा ॥६३॥ संस्कृताचा नसे गंध । मराठीही न ये शुद्ध । नाही पढलो शास्त्रछंद । कवित्वशक्ती अंगी नसे ॥६४॥ परी हे अमृत जाणोनी । आदर धरावा जी श्रवणी । असे माझी असंस्कृत वाणी । तियेकडे न पहावे ॥६५॥ न पाहता जी अवगुण । ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण । एवढी विनंती कर जोडोनी । चरणी आपुल्या करीतसे ॥६६॥ स्वामींच्या लीला बहुत । असती प्रसिद्ध लोकांत । त्या सर्व वर्णिता ग्रंथ । पसरेल समुद्रसा ॥६७॥ त्या महोदधीतुनी पाही । अमोल मुक्ताफळे घेतली काही । द्यावया मान सूज्ञाही । अवमान काही न करावा ॥६८॥ की हे उद्यान विस्तीर्ण । तयामाजी प्रवेश करोन । सुंदर कुसुमे निवडोन । हार त्यांचा गुंफिला ॥६९॥ कवि होवोनिया माळी । घाली श्रोत्यांच्या गळी । उभा ठाकोनि बद्धांजुळी । करी प्रार्थना सप्रेमे ॥७०॥ अहो या पुष्पांचा सुवास । तृप्त करील आपुले मानस । हा सुगंध नावडे जयास । तेचि पूर्ण अभागी ॥७१॥ आता असोत हे बोल । पुढे कथा बहु अमोल । वदविता स्वामी दयाळ । निमित्त मात्र विष्णुकवि ॥७२॥ वैराग्य प्रत्यक्ष शंकर । तेजे कैसा सहस्त्रकर । दुष्टां केवळ सूर्यपुत्र । भक्तां मातेसमान ॥७३॥ यतिराजपदकल्हार । विष्णुकवि होऊनी भ्रमर । ज्ञानमधुस्तव साचार । रुंची तेथे घालीतसे ॥७४॥ इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आदरे भक्त परिसोत । प्रथमोऽध्याय गोड हा ॥७५॥॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥



Wednesday, March 12, 2014

अध्याय २

। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय ।॥ श्री गणेशाय नमः ॥ कामना धरोनी जे भजती । होय त्यांची मनोरथपूर्ति । तैसेचि निष्काम भक्ताप्रती । कैवल्यप्राप्ती होतसे ॥१॥ नृसिंहसरस्वती प्रगट झाले । अगणित पापी तारिले । कर्दळीवनी गुप्त जहाले । गुरुचरित्री ती कथा ॥२॥ पुढे लोकोद्धाराकारणे । भाग पडले प्रगट होणे । धुंडिली बहुत पट्टणे । तेचि स्वामी यतिवर्य ॥३॥ स्वामींची जन्मपत्रिका । एका भक्ते केली देखा । परी तिजविषयी शंका । मनामाजी येतसे ॥४॥ गुरुराज गुप्त झाले । स्वामीरूपे प्रगटले । त्यांचे शकप्रमाण न मिळे । म्हणोनि शंका पत्रिकेची ॥५॥ ते केवळ अनादिसिद्ध । खुंटला तेथे पत्रिकावाद । लोकोद्धारासाठी प्रसिद्ध । मानवरूपे जाहले ॥६॥ अक्कलकोटा-माझारी । राचप्पा मोदी याचे घरी । बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टित ॥७॥ साहेब कोणी कलकत्त्याचा । हेतू धरोनी दर्शनाचा । पातला त्याच दिवशी साचा । आदर तयाचा केला की ॥८॥ त्याजसवे एक पारसी । आला होता दर्शनासी । ते येण्यापूर्वी मंडळीसी । महाराजांनी सुचविले ॥९॥ तीन खुर्च्या आणोनी बाहेरी । मांडा म्हणती एके हारी । दोघांसी बैसवोनी दोहोवरी । तिसरीवरी बैसले आपण ॥१०॥ पाहोनी समर्थांचे तेज । उभयतांसी वाटले चोज । साहेबाने प्रश्न केला सहज । आपण आला कोठूनी ॥११॥ स्वामींनी हास्यमुख करोनी । उत्तर दिले तयालागोनी । आम्ही कर्दळीवनांतुनी । प्रथमारंभी निघालो ॥१२॥ मग पाहिले कलकत्ता शहर । दुसरी नगरे देखिली अपूर्व । बंगालदेश समग्र । आम्ही असे पाहिला ॥१३॥ घेतले कालीचे दर्शन । पाहिले गंगातटाक पावन । नाना तीर्थे हिंडोन । हरिद्वाराप्रती गेलो ॥१४॥ पुढे पाहिले केदारेश्वर । हिंडलो तीर्थे समग्र । ऐसी हजारो हजार । नगरे आम्ही देखिली ॥१५॥ मग तेथुनी सहज गती । पातलो गोदातटाकाप्रती । जियेची महाप्रख्याती । पुराणांतरी वर्णिली ॥१६॥ केले गोदावरीचे स्नान । स्थळे पाहिली परम पावन । काही दिवस फिरोन । हैदराबादेसी पातलो ॥१७॥ येउनिया मंगळवेढ्यास । बहुत दिवस केला वास । मग येउनिया पंढरपुरास । स्वेच्छेने तेथे राहिलो ॥१८॥ तदनंतर बेगमपूर । पाहिले आम्ही सुंदर । रमले आमुचे अंतर । काही दिवस राहिलो ॥१९॥ तेथोनि स्वेच्छेने केवळ । मग पाहिले मोहोळ । देश हिंडोनी सकळ । सोलापुरी पातलो ॥२०॥ तेथे आम्ही काही महिने । वास केला स्वेच्छेने । अक्कलकोटा-प्रती येणे । तेथोनिया जाहले ॥२१॥ तैपासूनि या नगरात । आनंदे आहो नांदत । ऐसे आमुचे सकल वृत्त । गेले उठोनी उभयता ॥२२॥ ऐकोनिया ऐशी वाणी । उभयता संतोषले मनी । मग स्वामी आज्ञा घेवोनी । गेले उठोनी उभयता ॥२३॥ द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती । राहिले स्वामीराज यती । परी त्या स्थळी प्रख्याती । विशेष त्यांची न जाहली ॥२४॥ सदा वास अरण्यात । बहुधा न येती गावात । जरी आलिया क्वचित । गलिच्छ जागी बैसती ॥२५॥ कोणी काही आमोनि देती । तेचि महाराज भक्षिती । क्षणैक राहूनि मागुती । अरण्यात जाती उठोनी ॥२६॥ वेडा बुवा तयांप्रती । गावातील लोक म्हणती । कोणीही अज्ञाने नेणती । परब्रह्मरुप हे ॥२७॥ त्या समयी नामे दिगंबर । वृत्तीने केवळ जे शंकर । तेव्हा तयांचा अवतार । सोलापुरी जाहला ॥२८॥ ते जाणोनी अंतरखूण । स्वामींसी मानिती ईश्वरासमान । परी दुसरे अज्ञ जन । वेडा म्हणोनी लेखिती ॥२९॥ दर्शना येता दिगंबर । लीलाविग्रही यतिवर्य । कंबरेवरी ठेवूनी कर । दर्शन देती तयासी ॥३०॥ अमृतासमान पुढे कथा । ऐकता पावन श्रोता वक्ता । स्वामी समर्थ वदविता । ज्यांची सत्ता सर्वत्र ॥३१॥ अहो हे स्वामी चरित्र । भरला असे क्षिरसागर । मुक्त करोनी श्रवणद्वार । प्राशन करा श्रोते हो ॥३२॥ तुम्हा नसावा येथे वीट । सर्वदा सेवावे आकंठ । भवभयाचे अरिष्ट । तेणे चुके विष्णू म्हणे ॥३३॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आनंदे भक्त परिसोत । द्वितीयोऽध्याय गोड हा ॥३४॥॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥


Tuesday, March 11, 2014

अध्याय ३

। श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ धन्य धन्य ते या जगती । स्वामीचरणी ज्यांची भक्ती । त्यांसी नाही पुनरावृत्ती । पद पावती कैवल्य ॥१॥ गताध्यायी कथा सुंदर । स्वामींनी निवेदिले स्वचरित्र । आणि बाबा दिगंबर । त्यांचे वृत्त निवेदिले ॥२॥ निर्विकार स्वामीमूर्ति । लोका चमत्कार दाविती । काही वर्षे करोनी वस्ती । मंगळवेढे सोडिले ॥३॥ मोहोळमाजी वास्तव्य करीता । आप्पा टोळ झाले भक्त । तेथीचे साकल्य वृत्त । अल्पमती केवी वर्णू ॥४॥ स्वामी चरित्राचे हे सार । म्हणून केला नाही विस्तार । वर्णिता कथा समग्र । ग्रंथ पसरे उदधीसम ॥५॥ सवे घेउनी स्वामींसी । टोळ जाती अक्कलकोटासी । अर्धमार्गावरुनी टोळांसी । मागे परतणे भाग पडे ॥६॥ टोळ आज्ञापिले सेवका । जोवरी आम्ही येउ का । तोवरी स्वामींसी सोडू नका । येथेच मुक्काम करावा ॥७॥ टोळ गेलिया परतोनी । स्वामी चालले उठोनी । बहुत वर्जिले सेवकांनी । परी नच मानिले त्या ॥८॥ तेथोनिया निघाले । अक्कलकोटाप्रती आले । ग्रामद्वारी बैसले । यतिराज स्वेच्छेने ॥९॥ तेथे एक अविंध होता । तो करी तयांची थट्टा । परी काही चमत्कार पाहता । महासिद्ध समजला ॥१०॥ पूर्वपुण्यास्तव निश्चिती । आले चोळप्पाचे गृहाप्रती । स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती । चोळप्पा करी आदर ॥११॥ चोळप्पाचे भाग्य उदेले । यतिराज गृहासी आले । जैसी कामधेनू आपण बळे । दरिद्रियाच्या घरी जाय ॥१२॥ पूर्वपुण्य होते गाठी । म्हणूनी घडल्या या गोष्टी । झाली स्वामीराज भेटी । परम भाग्य तयाचे ॥१३॥ धन्य धन्य तयाचे सदन । जे स्वामींचे वास्तव्यस्थान । सुरवरां जे दुर्लभ चरण । तयाच्या घरी लागले ॥१४॥ योगाभ्यासी योग साधिती । तडी तापडी मार्गी श्रमती । निराहार कितीक राहती । मौन धरिती किती एक ॥१५॥ एक चरणी उभे राहोन । सदा विलोकिती गगन । एक गिरीगव्हरी बैसोन । तपश्चर्या करिताती ॥१६॥ एक पंचाग्निसाधन करिती । एक पवनाते भक्षिती । कित्येक संन्यासी होती । संसार अवघा सांडोनी ॥१७॥ एक करिती किर्तन । एक मांडिती पूजन । एक करिती होमहवन । एक षट्कर्मे आचरिती ॥१८॥ एक लोका उपदेशिती । एक भजनामाजी नाचती । एक ब्राम्हण भोजन करिती । एक बांधिती देवालये ॥१९॥ परी जयाचे चरण । दुर्लभ सद्भक्तिवाचोन । केलियासी नाना साधन । भावाविण सर्व व्यर्थ ॥२०॥ योगयागादिक काही । चोळप्पाने केले नाही । परी भक्तिस्तव पाही । स्वामी आले सदनाते ॥२१॥ तयाची देखोनिया भक्ती । स्वामी तेथे भोजन करिती । तेव्हा चोळप्पाचे चित्ती । आनंद झाला बहुसाळ ॥२२॥ तैपासून तयाचे घरी । राहिले स्वामी अवतारी । दिवसेंदिवस चाकरी । चोळप्पा करी अधिकाधिक ॥२३॥ तेव्ही राज्यपदाधिकारी । मालोजीराजे गादीवरी । दक्ष असोनी कारभारी । परम ज्ञानी असती जे ॥२४॥ अक्कलकोटची प्रख्याती । तेव्हा काही विशेष नव्हती । परी तयांचे भाग्य निश्चिती । स्वामीचरणी उदेले ॥२५॥ तैपासून जगांत । त्या नगराचे नाव गाजत । अप्रसिद्ध ते प्रख्यात । कितीएक जाहले ॥२६॥ चोळप्पाचे गृहाप्रती । आले कोणी एक यती । लोका चमत्कार दाविती । गावात बात पसरली ॥२७॥ आपुली व्हावी प्रख्याती । ऐसे नाही जयांचे चित्ती । म्हणुनिया स्वामीराज यती । बहुधा न जाती फिरावया ॥२८॥ लोकांमाजी पसरली मात । नृपासी कळला वृत्तांत । की आपुलिया नगरात । यती विख्यात पातले ॥२९॥ राहती चोळप्पाचे घरी । दर्शना जाती नरनारी । असती केवळ अवतारी । लीला ज्यांची विचित्र ॥३०॥ वार्ता ऐसी ऐकोनी । राव बोलले काय वाणी । गावात यती येवोनी । फार दिवस जाहले ॥३१॥ परी आम्ही श्रुत पाही । आजवरी जाहले नाही । आता जावोनी लवलाही । भेटू तया यतिवर्या ॥३२॥ परी ते केवळ अंतर्ज्ञानी । ऐसी वार्ता ऐकली कानी । हे सत्य तरी येवोनी । आताच देती दर्शना ॥३३॥ रावमुखातून वाणी निघाली । तोचि यतिमूर्ती पुढे ठेली । सकल सभा चकित झाली । मति गुंगली रायाची ॥३४॥ सिंहासनाखाली उतरोन । राव घाली लोटांगण । प्रेमाश्रूंनी भरले नयन । कंठ झाला सद्गदित ॥३५॥ दृढ घातली मिठी चरणी । चरण धुतले नेत्राश्रूंनी । मग तया हस्तकी धरोनी । आसनावरी बैसविले ॥३६॥ खूण पटली अंतरी । स्वामी केवळ अवतारी । अभक्ती पळोनी गेली दूरी । चरणी भक्ती जडली तै ॥३७॥ सकळ सभा आनंदली । समस्ती पाऊले वंदिली । षोडशोपचारे पूजिली । स्वामीमूर्ती नृपराये ॥३८॥ निराकार आणि निर्गुण । भक्तांसाठी झाले सगुण । तयांच्या पादुका शिरी धरोन । विष्णू नाचे ब्रह्मानंदे ॥३९॥ इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । प्रेमळ भक्त परिसोत । तृतीयोऽध्याय गोड हा ॥४०॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Monday, March 10, 2014

अध्याय ४

। श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय ।


॥ श्री गणेशाय नमः ॥ मुखे कीर्तन करावे । अथवा श्रवणी ऐकावे । षोडशोपचारे पूजावे । स्वामीचरण भक्तीने ॥१॥ न लगे करणे तीर्थाटन । योग्याभ्यास होमहवन । सांडोनिया अवघा शीण । नामस्मरण करावे ॥२॥ स्वामी नामाचा जप करिता । चारी पुरुषार्थ योती हाता । स्वामीचरित्र गात ऐकता । पुनरावृत्ति चुकेल ॥३॥ गताध्यायाचे अंती । अक्कलकोटी आले यति । नृपराया दर्शन देती । स्वेच्छेने राहती तया पुरी ॥४॥ चोळप्पाचा दृढ भाव । घरी राहिले स्वामीराव । हे तयाचे सुकृत पूर्व । नित्य सेवा घडे त्याते ॥५॥ जे केवळ वैकुंठवासी । अष्टसिद्धी ज्यांच्या दासी । नवविधी तत्पर सेवेसी । ते धरिती मानवरुप ॥६॥ चोळप्पा केवळ निर्धन । परी स्वामीकृपा होता पूर्ण । लक्ष्मी होऊनिया आपण । सहज आली तया घरी ॥७॥ कैसी आहे तयाची भक्ती । नित्य पाहती परीक्षा यति । नाना प्रकारे त्रास देती । परी तो कधी न कंटाळे ॥८॥ चोळप्पाची सद़्गुणी कांता । तीही केवळ पतिव्रता । सदोदित तिच्या चित्ता । आनंद स्वामीसेवेचा ॥९॥ स्वामी नाना खेळ खेळती । विचित्र लीला दाखविती । नगरवासी जनांची भक्ती । दिवसेंदिवस दृढ जडली ॥१०॥ स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । देशोदेशी झाली ख्याती । बहुत लोक दर्शना येती । कामना चित्ती धरोनी ॥११॥ कोणी संपत्तीकारणे । कोणी मागते संताने । व्हावी म्हणोनिया लग्ने येती दूर देशाहूनी ॥१२॥ शरीरभोगे कष्टले । संसारतापे तप्त झाले । मायामय पसाऱ्याते फसले । ऐसे आले किती एक ॥१३॥ सर्वांशी कल्पद्रुमासमान । होऊनी कामना करिती पूर्ण । भक्तकाजास्तव अवतीर्ण । मानवरूपे जाहले ॥१४॥ भक्त अंतरी जे जे इच्छिती । ते ते यतिराज पुरविती । दृढ चरणी जयांची भक्ति । त्यासी होती कल्पतरू ॥१५॥ जे का निंदक कुटिल । तया शास्ते केवळे । नास्तिकाप्रती तात्काळ । योग्य शासन करिताती ॥१६॥ महिमा वाढला विशेष । कित्येक करू लागले द्वेष । कोणा एका समयास । वर्तमान घडले पै ॥१७॥ कोणी दोन संन्यासी । आले अक्कलकोटासी । हासोनि म्हणती जनांसी । ढोंगियाच्या नादी लागला ॥१८॥ हा स्वामी नव्हे ढोंगी । जो नाना भोग भोगी । साधू लक्षणे याचे अंगी । कोणते ही वसतसे ॥१९॥ काय तुम्हा वेड लागले । वंदिता ढोंग्याची पाऊले । यात स्वार्थ ना परमार्थ मिळे । फसला तुम्ही अवघेही ॥२०॥ ऐसे तयांनी निंदिले । समर्थांनी अंतरी जाणिले । जेव्हा ते भेटीसी आले । तेव्हा केले नवल एक ॥२१॥ पहावया आले लक्षण । समर्थ समजले ती खूण । ज्या घरी बैसले तेथोन । उठोनिया चालिले ॥२२॥ एका भक्ताचिया घरी । पातली समर्थांची स्वारी । तेही दोघे अविचारी । होते बरोबरी संन्यासी ॥२३॥ तेथे या तिन्ही मूर्ती । बैसविल्या भक्ते पाटावरती । श्रीस्वामी आपुले चित्ती । चमत्कार म्हणती करू आता ॥२४॥ दर्शनेच्छू जन असंख्यात । पातले तेथे क्षणार्धात । समाज दाटला बहुत । एकच गर्दी जाहली ॥२५॥ दर्शन घेऊन चरणांचे । मंगल नांव गर्जतीवाचे । हेतू पुरवावे मनीचे । म्हणोनिया विनविती ॥२६॥ कोणी द्रव्य पुढे ठेविती । कोणी फळे समर्पिती । नाना वस्तू अर्पण करिती । नाही मिती तयांचे ॥२७॥ कोणी नवसाते करिती । कोणी आणोनिया देती । कोणी काही संकल्प करिती । चरण पूजिती आनंदे ॥२८॥ संन्यासी कौतुक पाहती । मनामाजी आश्चर्य करिती । क्षण एक तटस्थ होती । वैरभाव विसरोनी ॥२९॥ क्षण एक घडता सत्संगती । तत्काळ पालटे की कुमति । म्हणोनी कवि वर्णिताती । संतमहिमा विशेष ॥३०॥ स्वामीपुढे जे जे पदार्थ । पडले होते असंख्यात । ते निजहस्ते समर्थ । संन्याशांपुढे लोटिती ॥३१॥ पाणी सुटले त्यांच्या मुखासी । म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी । आजसारा दिवस उपवासी । जीव आमुचा कळवळला ॥३२॥ मोडली जनांची गर्दी । तो येवोनी सेवेकरी । संन्याशांपुढल्या नानापरी । वस्तू नेऊ लागले ॥३३॥ तेव्हा एक क्षणार्धात । द्रव्यादिक सारे नेत । संन्यासी मनी झुरत । व्याकुळ होत भुकेने ॥३४॥ समर्थांनी त्या दिवशी । स्पर्श न केला अन्नोदकासी । सूर्य जाता अस्ताचलासी । तेथोनिया उठले ॥३५॥ दोघे संन्यासी त्या दिवशी । राहिले केवळ उपवासी । रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे ॥३६॥ जे पातले करू छळणा । त्यांची जाहली विटंबना । दंडावया कुत्सित जना । अवतरले यतिवर्य ॥३७॥ त्यांच्या चरणी ज्यांची भक्ति । त्यांचे मनोरथ पुरविती । पसरली जगी ऐशी ख्याती । लीला ज्यांची विचित्र ॥३८॥ श्रीपादवल्लभ भक्ति । कलियुगी वाढेल निश्चिती । त्यांचा अवतार स्वामी यति । वर्णी कीर्ती विष्णुदास ॥३९॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त । चतुर्थोध्याय गोड हा ॥४०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Sunday, March 9, 2014

अध्याय ५

श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय ।




॥ श्री गणेशाय नमः ॥ भवकानन वैश्वानरा । अज्ञानतमच्छेदका भास्करा । पूर्णसाक्षी परात्परा । भक्ता खरा सदय तू ॥१॥ गंगाजळ जैसे निर्मळ । तैसे तुझे मन कोमल । तुजसी स्तवितां प्रेमळ । सत्वर त्याते पावसी ॥२॥ विशेष गंगाजळाहून । आपुले असे महिमान । पाप ताप आणि दैन्य । तुमच्या स्मरणे निवारती ॥३॥ स्वामीचरित्र कराया श्रवण । श्रोते बैसले सावधान । प्रसंगाहूनि प्रसंग पूर्ण । रसभरित पुढे पुढे ॥४॥ ज्यांचे सबळ पूर्वपुण्य । तया झाले स्वामीदर्शन । ऐसे चोळप्पा आदीकरून । भाग्यवंत सेवेकरी ॥५॥ अक्कलकोट नगरात । एक तपापर्यंत । स्वामीराज वास करीत । भक्त बहुत जाहले ॥६॥ वार्ता पसरली चहूकडे । कोणासी पडता साकडे । धाव घेती स्वामींकडे । राजेरजवाडे थोर थोर ॥७॥ म्हणती भोसल्यांचे भाग्य परम । स्वामीरत्न लाभले उत्तम । नृपतीही भक्त निःस्सीम । स्वामीचरणी चित्त त्यांचे ॥८॥ तेव्ही किती एक नृपती । स्वामीदर्शन घेऊ इच्छिती । आणि आपुल्या नगराप्रती । आणू म्हणती तयांसी ॥९॥ बडोद्यामाजी त्या अवसरी । मल्हारराव राज्याधिकारी । एकदा तयांचे अंतरी । विचार ऐसा पातला ॥१०॥ अक्कलकोटाहुनी स्वामींसी । आणावे आपुल्या नगरासी । मग कोणे एके दिवशी । विचार ऐसा पातला ॥११॥ दिवाण आणि सरदार । मानकरी तैसे थोर थोर । बैसले असता समग्र । बोले नृपवर तयांप्रती ॥१२॥ कोणी जाऊनी अक्कलकोटासी । येथे आणील स्वामींसी । तरी आम्ही तयासी । इनाम देऊ बहुत ॥१३॥ त्याचा राखू सन्मान । लागेल तितुके देऊ धन । ही वटपुरी वैकुंठभवन । वसता स्वामी होईल ॥१४॥ कार्य जाणुनी कठीण । कोणी न बोलती वचन । कोणा एका लागून । गोष्ट मान्य करवेना ॥१५॥ तेव्हा तात्यासाहेब सरदार । होता योग्य आणि चतुर । तो बोलता झाला उत्तर । नृपालागी परियेसा ॥१६॥ आपुली जरी इच्छा ऐसी । स्वामींते आणावे वटपुरीसी । तरी मी आणीन तयांसी । निश्चय मानसी असो द्या ॥१७॥ ऐसे ऐकोनी उत्तर । संतोषला तो नृपवर । तैसी सभाही समग्र । आनंदित जाहली ॥१८॥ संजिवनी विद्या साधण्याकरिता । शुक्राजवळी कच जाता । दैवी सन्मानिला होता । बहुत आनंदे करोनी ॥१९॥ नृपतीसह सकळ जने । त्यापरी तात्यांसी सन्माने । गौरवोनि मधुर वचने । यशस्वी म्हणती तया ॥२०॥ बहुत धन देत नृपती । सेवक दिधले सांगाती । जावया अक्कलकोटाप्रती । आज्ञा दिधली तात्याते ॥२१॥ तात्यासाहेब निघाले । सत्वर अक्कलकोटी आले । नगर पाहुनी संतोषले । जे केवळ वैकुंठ ॥२२॥ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती । आनंदीत झाले चित्ती । तेथील जनांची पाहुनी भक्ती । धन्य म्हणती तयाते ॥२३॥ अक्कलकोटीचे नृपती । स्वामीचरणी त्यांची भक्ती । राजघराण्यातील युवती । त्याही करिती स्वामीसेवा ॥२४॥ आणि सर्व नागरिक । तेही झाले स्वामीसेवक । त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक । सेवेकरी निःस्सीम ॥२५॥ ऐसे पाहुनी तात्यांसी । विचार पडला मानसी । या नगरातुनी स्वामीसी । कैसे नेऊ आपण ॥२६॥ अक्कलकोटीचे सकल जन । स्वामीभक्त झाले पूर्ण । स्वामींचेही मन रमोन । गेले ऐसे ह्या ठाया ॥२७॥ प्रयत्नांती परमेश्वर । प्रयत्ने कार्य होय सत्वर । लढवोनी युक्ति थोर । कार्य आपण साधावे ॥२८॥ ऐसा मनी विचार करोनी । कार्य आरंभिले तात्यांनी । संतुष्ट रहावे सेवकजनी । ऐसे सदा करिताती ॥२९॥ करोनी नाना पक्वान्ने । करिती ब्राह्मणभोजने । दिधली बहुसाल दाने । याचक धने तृप्त केले ॥३०॥ स्वामीचिया पूजेप्रती । नाना द्रव्ये समर्पिती । जेणे सेवेकरी संतुष्ट होती । ऐसे करिती सर्वदा ॥३१॥ प्रसन्न व्हावे भक्तवत्सले । कार्य साधावे आपुले । म्हणोनी नाना उपाय केले । द्रव्य वेचिले तात्यांनी ॥३२॥ ऐशीयाने काही न झाले । केले तितुके व्यर्थे गेले । तात्या मनी खिन्न झाले । विचार पडला तयांसी ॥३३॥ मग लढविली एक युक्ती । एकांती गाठूनी चोळप्पाप्रती । त्याजलागी विनंती करिती । बुद्धीवाद सांगती त्या ॥३४॥ जरी तुम्ही समर्थांसी । घेऊनी याल बडोद्यासी । मग मल्हारराव आदरेसी । इनाम देतील तुम्हाते ॥३५॥ मान राहील दरबारी । आणि देतील जहागिरी । ऐसे नानाप्रकारी । चोळप्पाते सांगितले ॥३६॥ द्रव्येण सर्वे वशः । चोळप्पासी लागली आशा । तयाच्या अंतरी भरवसा । जहागिरीचा बहुसाल ॥३७॥ मग कोणे एके दिवशी । करीत असता स्वामीसेवेसी । यतिराज तया समयासी । आनंदवृत्ती बैसले ॥३८॥ चोळप्पाने कर जोडोनी । विनंती केली मधुर वचनी । कृपाळू होऊनी समर्थांनी । बडोद्याप्रती चलावे ॥३९॥ तेणे माझे कल्याण । मिळेल मला बहुत धन । आपुलाही योग्य सन्मान । तेथे जाता होईल ॥४०॥ ऐसे ऐकोनिया वचन । समर्थांनी हास्य करोन । उत्तर चोळप्पालागोन । काय दिले सत्वर ॥४१॥ रावमल्हार नृपती । त्याच्या अंतरी नाही भक्ती । मग आम्ही बडोद्याप्रती । काय म्हणोनी चलावे ॥४२॥ पुढले अध्यायी सुंदर कथा । पावन होय श्रोता वक्ता । श्रीस्वामीराज वदविता । निमित्त विष्णूदास असे ॥४३॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । पंचमोध्याय गोड हा ॥४४॥॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Saturday, March 8, 2014

अध्याय ६

||श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय||


॥ श्री गणेशाय नमः ॥ धरोनी शिशूचा हात । अक्षरे पंडित लिहवीत । तैसे स्वामीचरित्रामृत । स्वामी समर्थ वदविती ॥१॥ मी केवळ मतिमंद । केवी वर्णू चरित्र अगाध । परी माझा हा छंद । स्वामी समर्थ पुरविती ॥२॥ ज्यांच्या वरप्रसादे करून । मुढा होई शास्त्रज्ञान । त्या समर्थांचे चरण । वारंवार नमितसे ॥३॥ कृपाळू होऊन समर्था । वदवावे आपुल्या चरित्रा । श्रवणे श्रोतयांच्या चित्ता । ब्रह्मानंद प्राप्त होवो ॥४॥ सुरतरूची घेऊनी सुमने । त्यासीच अर्पावी प्रीतीने । झाला ग्रंथ स्वामीकृपेने । त्यांच्याच पदी अर्पिजे ॥५॥ मागील अध्यायाच्या अंती । चोळप्पा विनवी स्वामीप्रती । कृपा करोनी मजवरती । बडोद्याप्रती चलावे ॥६॥ भाषण ऐसे ऐकोनी । समर्थ बोलती हसोनी । मल्हाररावाचिया मनी । आम्हांविषयी भाव नसे ॥७॥ म्हणोनी तयाच्या नगरात । आम्हा जाणे नव्हे उचित । अक्कलकोट नगरांत । आम्हा राहणे आवडे ॥८॥ ऐसी ऐकोनिया वाणी । चोळप्पा खिन्न झाला मनी । त्याने सत्वर येवोनी । तात्यांप्रती सांगितले ॥९॥ ऐसा यत्न व्यर्थ गेला । तात्या मनी चिंतावला । आपण आलो ज्या कार्याला । ते न जाय सिद्धीसी ॥१०॥ परी पहावा यत्न करोनी । ऐसा विचार केला मनी । मग काय केले तात्यांनी । अनुष्ठान आरंभिले ॥११॥ ऐसे नाना उपाय केले । परी ते सर्व व्यर्थ गेले । कार्य सिद्धीस न गेले । खिन्न झाले मुख त्यांचे ॥१२॥ भक्ती नाही अंतरी । दांभिक साधनांते करी । तयांते स्वामी नरहरी । प्रसन्न कैसे होतील ॥१३॥ तयांनी माजविली ढोंगे । आणि केली नाना सोंगे । भक्तीवीण हटयोगे । स्वामीकृपा न होय ॥१४॥ मग तात्यांनी काय केले । सप्ताहासी ब्राह्मण बैसविले । गुरुचरित्र आरंभिले । व्हावयासी स्वामीकृपा ॥१५॥ परी तयाच्या वाड्यात । कधी न गेले समर्थ । तात्या झाला व्यग्रचित्त । काही उपाय सुचेना ॥१६॥ मल्हारराव नृपाने । पाठविले ज्या कार्याकारणे । ते आपुल्या हातून होणे । अशक्य असे वाटते ॥१७॥ आता जाऊनी बडोद्यासी । काय सांगावे राजयासी । आमि सकळ जनांसी । तोंड कैसे दाखवावे ॥१८॥ ऐशा उपाये करोन । न होती स्वामी प्रसन्न । आता एक युक्ति योजून । न्यावे पळवोन यतीसी ॥१९॥ स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । हे नेणे तो मंदमती । म्हणूनी योजिली कपटयुक्ती । परी ते सिद्धीते न जाय ॥२०॥ असो कोणे एके दिवशी । साधोनी योग्य समयासी । मेण्यात घालोनी स्वामीसी । तात्यासाहेब निघाले ॥२१॥ कडबगांवचा मार्ग धरिला । अर्धमार्गी मेणा आला । अंतरसाक्षी समर्थांला । गोष्ट विदित जाहली ॥२२॥ मेण्यातून उतरले । मागुती अक्कलकोटी आले । ऐसे बहुत वेळा घडले । हाही उपाय खुंटला ॥२३॥ मग पुढे राजवाड्यांत । जाऊनिया राहिले समर्थ । तेव्हा उपाय खुंटत । टेकिले हात तात्यांनी ॥२४॥ या प्रकारे यत्न केले । परी तितुके व्यर्थ गेले । व्यर्थ दिवस गमाविले । द्रव्य वेचिले व्यर्थची ॥२५॥ मग अपयशाते घेवोनी । बडोद्यासी आले परतोनी । समर्थकृपा भक्तीवाचोनी । अन्य उपाये न होय ॥२६॥ परी मल्हारराव नृपती । प्रयत्न आरंभिती पुढती । सर्वत्रांसी विचारीती । कोण जातो स्वामींकडे ॥२७॥ तेव्ही मराठा उमराव । नृपकार्याची धरुनी हाव । आपण पुढे जाहला ॥२८॥ स्वामीकारणे वस्त्रे भूषणे । धन आणि अमोल रत्ने । देऊनी त्याजवळी नृपाने । आज्ञा दिधली जावया ॥२९॥ तो येवोनी अक्कलकोटी । घेतली समर्थांची भेटी । वस्त्रे अलंकार सुवर्णताटी । स्वामीपुढे ठेवित ॥३०॥ ती पाहून समर्थाला । तेव्हा अनिवार क्रोध आला । यशवंता पाहोनी डोळा । काय तेव्हा बोलले ॥३१॥ अरे बेडी आणोनी । सत्वर ठोका याचे चरणी । ऐसे त्रिवार मोठ्यांनी । समर्थ क्रोधे बोलले ॥३२॥ क्रोध मुद्रा पाहोनी । यशवंतराव भ्याला मनी । पळाले तोंडचे पाणी । लटलटा कापू लागला ॥३३॥ मग थोड्याच दिवशी । आज्ञा आली यशवंतासी । सत्वर यावे बडोद्यासी । तेथील कार्यासी सोडोनी ॥३४॥ साहेबा विषप्रयोग केला । मल्हाररावावरी आळ आला । त्या कृत्यामाजी यशवंताला । गुन्हेगार लेखिले ॥३५॥ हाती पायी बेडी पडली । स्वामीवचनाची प्रचिता आली । अघटित लीला दाविली । ख्याती झाली सर्वत्र ॥३६॥ समर्थांची अवकृपा जयावरी । त्याच्या कष्ट होती शरीरी । कृपा होय जयावरी । तया सर्वानंद प्राप्त होय ॥३७॥ महासमर्था भक्तपालका । अनादिसिद्धा जगन्नायका । निशिदिनी शंकर सखा । विष्णूचिया मनी वसे ॥३८॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भक्त परिसोत । षष्ठोध्याय गोड हा ॥३९॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Friday, March 7, 2014

अध्याय ७





। श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी निर्गुणा । जयजयाजी सनातना । जयजयाजी अघहरणा । लोकपाला सर्वेशा ॥१॥ आपुल्या कृपेकरोन । अल्प वर्णिले आपुले गुण । श्रोती द्यावे अवधान । श्रवणी आदर धरावा ॥२॥ अक्कलेकोटी मालोजी नृपती । समर्थचरणी जयाची भक्ति । स्वहस्ते सेवा नित्य करिती । जाणोनी यती परब्रह्म ॥३॥ वेदांत आवडे तयासी । श्रवण करिती दिवसनिशी । शास्री हेरळीकरादिकांसी । वेतने देऊनि ठेविले ॥४॥ त्या समयी मुंबापुरी । विष्णुबुवा ब्रह्मचारी । प्राकृत भाषणे वेदांतावरी । करुनी लोका उपदेशिती ॥५॥ कैकांचे भ्रम दवडिले । परधर्मोपदेशका जिंकिले । कुमार्गवर्तियांसी आणिले सन्मार्गावरी तयांनी ॥६॥ त्यांसी आणावे अक्कलकोटी । हेतु उपजला नृपापोटी । बहुत करोनी खटपटी । बुवांसी शेवटी आणिले ॥७॥ नृपा आवडे वेदांत । बुवा त्यात पारंगत । भाषणे श्रोतयांचे चित्त । आकर्षूनि घेती ते ॥८॥ रात्रंदिन नृपमंदिरी । वेदांतचर्चा ब्रह्मचारी । करिती तेणे अंतरी । नृपती बहु सुखावे ॥९॥ अमृतानुभवादि ग्रंथ । आणि ज्ञानेश्वरी विख्यात । कित्येक संस्कृत प्राकृत । वेदांत ग्रंथ होते जे ॥१०॥ त्यांचे करोनि विवरण । संतोषित केले सर्व जन । तया नगरी सन्मान । बहुत पावले ब्रह्मचारी ॥११॥ ख्याती वाढली लोकांत । स्तुति करिती जन समस्त । सदा चर्चा वेदांत । राजगृही होतसे ॥१२॥ जे भक्तजनांचे माहेर । प्रत्यक्ष दत्ताचा अवतार । ते समर्थ यतीश्वर । अक्कलकोटी नांदती ॥१३॥ एके दिवशी सहज स्थिती । ब्रह्मचारी दर्शना येती । श्रेष्ठ जन सांगाती । कित्येक होते तया वेळी ॥१४॥ पहावया यतीचे लक्षण । ब्रह्मचारी करिती भाषण । काही वेदांतविषय काढून । प्रश्न करिती स्वामींसी ॥१५॥ ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार । ऐसे ऐकोनि सत्वर । यतिराज हासले ॥१६॥ मुखे काही न बोलती । वारंवार हास्य करिती । पाहून ऐशी विचित्र वृत्ती । बुवा म्हणती काय मनी ॥१७॥ हा तो वेडा संन्यासी । भुरळ पडली लोकांसी । लागले व्यर्थ भक्तिसी । याने ढोंग माजविले ॥१८॥ तेथोनि निघाले ब्रह्मचारी । आले सत्वर बाहेरी । लोका बोलती हास्योत्तरी । तुम्ही व्यर्थ फसला हो ॥१९॥ परमेश्वररुप म्हणता यती । आणि करिता त्याची भक्ति । परी हा भ्रम तुम्हांप्रती । पडला असे सत्यची ॥२०॥ पाहोनि तुमचे अज्ञान । याचे वाढले ढोंग पूर्ण । वेदशास्रादिक ज्ञान । याते काही असेना ॥२१॥ ऐसे ब्रह्मचारी बोलोनी । पातले आपुल्या स्वस्थानी । विकल्प पातला मानी । स्वामींसी तुच्छ मानिती ॥२२॥ नित्यनियम सारोन । ब्रह्मचारी करिती शयन । जवळी पारशी दोघेजण । तेही निद्रिस्थ जाहले ॥२३॥ निद्रा लागली बुवांसी । लोटली काही निशी । एक स्वप्न तयांसी । चमत्कारिक पडलेसे ॥२४॥ आपुल्या अंगावरी वृश्चिक । एकाएकी चढले असंख्य । महाविषारी त्यातुनी एक । दंश आपणा करीतसे ॥२५॥ ऐसे पाहोनी ब्रह्मचारी । खडबडोनी उठले लौकरी । बोबडी पडली वैखरी । शब्द एक ना बोलवे ॥२६॥ जवळी होते जे पारशी । जागृती आली तयांसी । त्यांनी धरोनी बवांसी । सावध केले त्या वेळी ॥२७॥ हृदय धडाधडा उडू लागले । धर्मे शरीर झाले ओले । तेव्हा पारशांनी पुसले । काय झाले म्हणोनी ॥२८॥ मग स्वप्नीचा वृत्तांत । तयासी सांगती समस्त । म्हणती यात काय अर्थ । ऐसी स्वप्न कैक पडती ॥२९॥ असो दुसऱ्या दिवशी । बुवा आले स्वामींपाशी । पुसता मागील प्रश्नासी । खदखदा स्वामी हासले ॥३०॥ मग काय बोलती यतीश्वर । ब्रह्मपदी तदाकार । होण्याविषयी अंतर । तुझे जरी इच्छितसे ॥३१॥ तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी । काय म्हणोनी भ्यालासी । जरी वृथा भय मानितोसी । मग ब्रह्मपदी जाणसी कैसे ॥३२॥ ब्रह्मपदी तदाकार होणे । हे नव्हे सोपे बोलणे । यासी लागती कष्ट करणे । फुकट हाता न येचि ॥३३॥ बुवांप्रती पटली खूण । धरिले तत्काळ स्वामीचरण । प्रेमाश्रूंनी भरले नयन । कंठ झाला सद़्गदित ॥३४॥ त्या समयापासोनी । भक्ती जडली स्वामीचरणी । अहंकार गेला पळोनी । ब्रह्मपदा योग्य झाले ॥३५॥ स्वामीचरित्र महासागर । त्यातूनी मुक्ते निवडूनी सुंदर । त्याचा करोनिया हार । अर्पी शंकर-विष्णुकवी ॥३६॥ इति श्री स्वामी चरित्र महासागर । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । सप्तमोध्याय गोड हा ॥३७॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Thursday, March 6, 2014

अध्याय ८


। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय ।


॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी सुखधामा । जयजयाजी परब्रह्मा । जयजय भक्तजन विश्रामा । अनंतवेषा अनंता ॥१॥ तुझ्याच कृपे करोन । अल्प वर्णिले स्वामीचरित्र । पुढे कथा सुरस अत्यंत । वदविता तूं दयाळ ॥२॥ मागील अध्यायाचे अंती । विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांप्रती । चमत्कार दाविती यती । ते चरित्र वर्णिले ॥३॥ अक्कलकोटी वास केला । जन लाविले भजनाला । आनंद होतसे सकला । वैकुंठासम नगरी ते ॥४॥ राजे निजाम सरकार । त्यांचे पदरी दप्तरदार । राजे रायबहाद्दूर । शंकरराव नामक ॥५॥ सहा लक्षांची जहागीर त्याप्रती । सकल सुखे अनुकूल असती । विपुल संपत्ती संतती । काही कमती असेना ॥६॥ परी पूर्वकर्म अगाध । तया लागला ब्रह्मसमंध । उपाय केले नानाविध । परी बाधा न सोडी ॥७॥ समंध बाधा म्हणोन । चैन न पडे रात्रंदिन । गेले शरीर सुकोन । गोड न लागे अन्नपाणी ॥८॥ नावडे भोगविलास । सुखोपभोग कैचा त्यास । निद्रा न येचि रात्रंदिवस । चिंतानले पोळले ॥९॥ केली कित्येक अनुष्ठाने । तशीच ब्राह्मण संतर्पणे । बहुसाल दिधली दाने । आरोग्य व्हावे म्हणोनी ॥१०॥ विटले संसारसौख्यासी । त्रासले या भवयात्रेसी । कृष्णवर्ण आला शरीरासी । रात्रंदिन चैन नसे ॥११॥ विधीने लेख भाली लिहिला । तो न चुके कवणाला । तदनुसार प्राणिमात्राला । भोगणे प्राप्त असे की ॥१२॥ कोणालागी जावे शरण । मजवरी कृपा करील कोण । सोडवील व्याधीपासोन । ऐसा कोण समर्थ ॥१३॥ मग केला एक विचार । प्रसिद्ध क्षेत्र श्रीगाणगापूर । तेथे जाऊनि अहोरात्र । दत्तसेवा करावी ॥१४॥ ऐसा विचार करोनी । तात्काळ आले त्या स्थानी । स्वतः बैसले अनुष्ठानी । व्याधी दूर व्हावया ॥१५॥ सेवा केली बहुवस । ऐसे लोटले तीन मास । एके रात्री तयास । स्वप्नी दृष्टांत जाहला ॥१६॥ अक्कलकोटी जावे तुवा । तेथे करावी स्वामीसेवा । यतिवचनी भाव धरावा । तेणे व्याधी जाय दूरी ॥१७॥ शंकररावांची भक्ती । स्वामीचरणी काही नव्हती । म्हणोनी दृष्टांतावरती । गाणगापूर न सोडिले ॥१८॥ ते तेथेचि राहिले । आणखी अनुष्ठान आरंभिले । पुन्हा तयांसी स्वप्नी पडले । अक्कलकोटी जावे तुवा ॥१९॥ हे जाणोनि हितगोष्टी । मानसी विचारुनि शेवटी । त्वरित आले अक्कलकोटी । प्रियपत्नीसहित ॥२०॥ अक्कलकोट नगरात । शंकरराव प्रवेशत । तो देखिल जन समस्त । प्रेमळ भक्त स्वामींचे ॥२१॥ स्वामीनाम वदती वाचे । कीर्तन स्वामीचरित्रांचे । पूजन स्वामीचरणांचे । आराध्यदैवत स्वामीच ॥२२॥ तया नगरीच्या नरनारी । कामधंदा करिता घरी । स्वामीचरित्र परस्परी । प्रेमभावे सांगती ॥२३॥ कित्येक प्रातःस्नाने करोनी । पूजाद्रव्य घेवोनी । अर्पावया समर्थचरणी । जाती अति त्वरेने ॥२४॥ महाराष्ट्र भाषा उद्यान । पद्मकुसुमे निवडोन । शंकर विष्णु दोघेजण । स्वामीचरण पुजिती ॥२५॥ इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । अष्टमोध्याय गोड हा ॥२६॥
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

****

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||