Saturday, March 15, 2014

श्री स्वामी समर्थावर मराठी अ‍ॅनिमेशनपट

सुनील नांदगावकर, शुक्रवार, २२ जुलै २०११

बालगणेश, बालहनुमान आणि रामायण यांसारख्या पौराणिक कथांवर प्रदर्शित झालेले अ‍ॅनिमेशनपट बच्चेकंपनीला तसेच मोठय़ांनाही आवडले होते. हॉलीवूडने तर डिजिटल तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यानंतर जगभरातील विविध भाषांमध्ये अ‍ॅनिमेशनपटांची निर्मिती केली आणि ते अ‍ॅनिमेशनपट प्रचंड लोकप्रियही ठरले. आता मराठीत प्रथमच अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थावर अ‍ॅनिमेशनपट तयार होत आहे.
स्वामी समर्थ यांचे चरित्र, चमत्कार आणि त्यांची शिकवण याचे चित्रण या अ‍ॅनिमेशनपटात केले जाणार आहे.
या अ‍ॅनिमेशनपटाची मूळ संकल्पना दिलीप प्रधान यांची असून दिग्दर्शनही तेच करणार आहेत. यासंदर्भात ते म्हणाले की, श्री स्वामी समर्थ हे आजानुबाहू होते. त्यामुळे त्यांच्यावर चित्रपट करताना त्यांची व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत आजानुबाहू असावा असे मला वाटले. ते शक्य नसल्यामुळेच अ‍ॅनिमेशनपट करण्याची कल्पना मनात आली. त्याशिवाय अ‍ॅनिमेशनपट हे मुख्यत: बच्चेकंपनीला आवडतात. स्वामी समर्थाची शिकवण आणि त्यांनी समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून मांडलेले विचार हे अ‍ॅनिमेशनपटाच्या माध्यमातून बालप्रेक्षकांनी पाहिले तर त्यांच्यावर चांगले संस्कार होऊ शकतात या उद्देशानेच अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती करणार असल्याचेही प्रधान यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. अ‍ॅनिमेशनपटात आजच्या काळातील स्वामी समर्थाचा भक्त दाखविण्यात आला असून त्या भक्ताला विविध रूपांमध्ये स्वामी समर्थ मदत करतात असे दाखविण्याचे ठरविले आहे. सध्या या अ‍ॅनिमेशनपटासाठी आवश्यक ती चित्रे काढण्याचे काम सुरू असून साधारणपणे दीड ते दोन कोटी रुपयांमध्ये हा थ्रीडी अ‍ॅनिमेशनपट सुरुवातीला डीव्हीडीवर तयार केला जाणार आहे. त्यानंतर डीव्हीडी फॉरमॅटवरून मोठय़ा पडद्यावर दाखविण्यासाठी प्रक्रिया केली जाणार असल्याची माहितीही दिलीप प्रधान यांनी दिली. अ‍ॅनिमेटर अमोल जगताप हे अ‍ॅनिमेशन करणार असून चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांशी चर्चा केल्यानंतरच मराठीत अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती करण्याचे ठरविले, असे सांगून प्रधान म्हणाले की, स्वरूपआनंद भालवणकर यांनी यासाठी १२ गाणी तयार केली असून पोवाडे व गाण्यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ यांनी केलेले चमत्कार दाखविण्यात येतील. साधारणपणे डिसेंबर अखेपर्यंत अ‍ॅनिमेशनपट डीव्हीडीवर प्रकाशित केला जाणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे थ्रीडी अ‍ॅनिमेशनपटांची संख्या वाढत असून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार होणाऱ्या अ‍ॅनिमेशनपटांनाही सरकारने अनुदान द्यायला हवे.

टीप :- सदर नोंदी मधील लेखन हे जसे च्या तसे 'वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर' या फेसबुक पृष्ठावरून घेण्यात आले आहे. त्यासाठी पृष्ठ व्यवस्थापकाचे आभार. सदर फेसबुक पृष्ठाची लिंक खाली जोडली आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=248581905241723&set=pb.207303642702883.-2207520000.1394866327.&type=3&theater

No comments:

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||