श्री स्वामी समर्थांची सत्ता या अखिल ब्रह्मांडावर आहे. सकळ प्राणीमात्रांमध्ये चैतन्य श्री स्वामींमुळे आहे.असा स्वमिभाक्तांचा ठाम विश्वास आहे. आणि त्याची प्रचीती त्यांना येतेच. स्वामींचे प्राण्यांवर खूप प्रेम होते.त्यांच्या सानिध्यात गायी,बैल,घोडे,कुत्रे नेहमीच असायचे. स्वामींना त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा होता.त्यांना ते प्रेमाने भरवत, त्यांच्या पाठीवरून हात फिरवत. निर्वाण समयी स्वामींनी सेवेकर्यांना आज्ञा केली होती कि सर्व जनावरांना मज जवळ आणा.
स्वामींनी त्यांच्या अंगावर आपल्या शाली, छाट्या टाकल्या होत्या,खूप प्रेमाने आणि करुणेने त्यांच्या अंगावरून हात फिरवला होता. आणि कसे काय कुणास ठाऊक त्या मुक्या जनावरांना सुद्धा कळले होते कि स्वामी आता जाणार. गायी वासरांच्या, घोड्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते.गायी हंबरडा फोडत होत्या.
स्वामी एके दिवशी राजवाड्यात झोपाळ्यावर राजाशी चर्चा करत होते.राजवाड्यातील देवघरात आप्पा सलभ पुजारी चंदन उगाळत होता.तेवढ्यात तिथे एक उंदीर आला आणि दिव्यातील वात खाऊ लागला. अप्पा सलभला संधी मिळताच हातातील चंदनाचे खोड त्या इवल्याशा उंदरावर फेकून मारले.उंदीर जागीच गतप्राण झाला. अप्पा मोठ्या ऐटीत उंदराची शेपटी धरून त्यास फेक्याला बाहेर जाऊ लागला. स्वामींनी हे पाहिले. त्या माउलीला राजा-रंक समान,सर्व भक्तांवर सारखीच माया मग तो उंदीर सुद्धा तितकाच अधिकारी.स्वामींचे हृदय कळवळले. त्यांनी अप्पाला आज्ञा केली.'ए तो उंदीर इकडे आण'. स्वामींनी उंदीर हातात घेऊन झोपाळ्याच्या कड्यांमधून त्याला आत बाहेर केले. आणि प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवून 'जाव बच्चा' अशी आज्ञा केली.उन्दिरामध्ये तत्काळ प्राण येउन तो ताडकन उडी मारून पळाला उपस्थितांना मोठा विस्मय आणि अप्पाला खूप पश्चाताप वाटला.
अक्कलकोटात एक ब्रिटीश अधिकारी वास्तव्यास होता. बंबगार्डन साहेब नाव त्याचे.तो स्थानिक लोकांना तुच्छ लेखायचा. एका स्वामी भक्ताला लाथ मारल्यामुळे त्याचा पाय व्याधी होऊन सडत गेला आणि पाय कापण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नसता स्वामींना शरण गेल्यामुळे स्वामींनी तो पाय त्यांच्या कृपादृष्टीने बरा कसा करून करून दाखवला त्याची कथा पुढे येईल च.
असो. या बंबगार्डन साहेबाकडे एक सुंदरी नावाची वांदरी पाळलेली होती.पुढे ती पिसाळली, येणाऱ्या जाणार्या माणसांना ती चावे. लहान मुलांना बुचकरे.त्यामुळे बंबगार्डन साहेब कंटाळून शिपायांना तिला गोळ्या घालून ठार मारण्याचा हुकुम केला.
शिपाई बंदूक घेऊन तिला शोधत होते.मागून धावत पळत होते. पण ती काही त्यांच्या हाती येईना. अशात स्वामींचा निजभक्त भुजंगा च्या कानावर हि गोष्ट आली. त्याने तडक स्वामींना सांगितले कि ह्या गोर्या साहेबाने त्याच्या शिपायांना पिसाळलेल्या वांदरीला गोळ्या घालून ठार मारण्याचा हुकुम दिला आहे. स्वामी भूजंगला म्हणाले. जा तिला सांग मी बोलावलंय. आज्ञा प्रमाण असे समजून भुजंगा तडक तिथे पोहोचला जिथे ती वांदरी कोंडीत अडकून त्या शिपायांना शरण आली होती.शिपाई तिला गोळ्या घालणार इतक्यात भुजंग म्हणाला थांबा तिला गोळ्या घालू नका.
आणि वांदरीला सांगितले ए चल तुला स्वामींनी बोलावलंय.
असे म्हणताच ती शहाण्या माणसा सारखी त्याच्या पाठून चालू लागली.
वडाखाली स्वामी बसले होते.तिथे ती श्रींच्या चरणी आली. श्री रागावून तिला म्हणाले.काय ग चावटे!!! लोकांना चावतेस. पुन्हा चावशील तर लाख लाख कोरडे मारू.असे म्हणताच ती उन्मत्त वांदरी स्वामींच्या पायाशी गडाबडा लोळू लागली.
पुढे ती वांदरी श्रींची स्वारी जीथे असेल तिथे जात असे.श्रींनी दिलेला प्रसाद खात असे.स्वामी कधी कधी तिच्या डोक्यावर आपली टोपी घालत.ती पुढे मरे पर्यंत स्वामींसन्निध होती. मरताना सुद्धा तीने श्रींच्या चरणावर आपला प्राण सोडला. गावकर्यांनी आणि सेवेकर्यांनी तिची वाजत गाजत, बुक्का उडवत मिरवणूक काढली आणि अंत्यसंस्कार केले.
स्वामी एके दिवशी नजीक च्या गावात लगबगीने निघाले होते. जवळ च एक निम्बाचे झाडावर एक चिमणी बसली होती. तिला बघून स्वामी म्हणाले तू कुठे जाऊ नकोस हा!! मी येई पर्यंत येथेच थांब. पुढे संध्याकाळ होता होता श्रींची स्वारी परत अक्कलकोटास यायला निघाली. वाटेवर ते झाड लागले.आणि आश्चर्य. ती चिमणी तशीच त्याच फांदीवर बसून होती.
सर्व लोकांना विस्मय वाटला. स्वामी तिजकडे पाहून म्हणाले.'जा ग आता तुला भूक लागली असेल'!!असे म्हणताच ती भुर्कन उडून गेली.
स्वामी मंगळवेढ्यात असताना एका कृष्णभट नावाच्या ब्रह्मणा घरी गेले.त्याजवळ खाण्यास दशमी मागितली.ब्राम्हण निर्धन असला तरी त्याजवळ गोधन होते. पण ती गाय भाकड होती. दुध देत नसे.तरी ब्राम्हण खूप प्रेमाने तिची सेवा करत होता.
स्वामींना दशमी हवीय म्हणून दुध आणण्यासाठी ब्राम्हणाची पत्नी लगोलग तांब्या घेऊन बहर जात असता ब्राम्हणाने
श्रींना विनंती केली."महाराज माझी पत्नी दुध घेऊन येईपर्यंत वाट पहावी लागेल. माफी असावी. पण दुध आणल्यावर चटकन ती तुम्हाला दशम्या करून खायला घालेल".
स्वामी म्हणाले 'अरे दारात गायत्री असताना तू दुसरीकडे कशास जातोस?'
ब्राम्हण म्हणाला "स्वामी अंगणात गाय आहे खरी. पण ती असून नसल्या सारखी.ती वांझ गाय आहे.तिला दुध कसे येईल".
स्वामी गायी जवळ जाऊन म्हणाले. 'गे माझी माय.तुझा मालक कुटुंबवत्सल आहे. त्यास दुध देत जा'.
असे म्हणून गायीच्या पाठीवरून हात फिरवला. ब्राम्हणास आज्ञा केली कि जा चवरी आण दुध काढून घे.
ब्राम्हणाने विश्वासाने धार काढावयास घेतली.आणि चमत्कार झाला. जी गाय आज पर्यंत भाकड,वांझ म्हणून आपण पोसली त्या गायीने स्वामींच्या आज्ञेने चांगले दुध दिले. ब्राम्हण पत्नीने स्वामींना दशम्यांचा प्रसाद करून वाढला.स्वामींनी दोघांना तुमच्या घरी अखंडलक्ष्मी नांदेल असा आशीर्वाद दिला.
अशा रीतीने स्वामींच्या आज्ञेनुसार सर्व प्राणीमात्र,अखिल ब्रम्हांड वर्तते याची कल्पना आपणास येते.
No comments:
Post a Comment