Saturday, March 15, 2014

'बुडणारे जहाज वाचवले'


ठाण्यातील लक्ष्मण कोळी आपल्या स्वजनांसहित अक्कलकोट ला श्रींच्या दर्शनास आला होता. श्रींवर त्याची खूप श्रद्धा जडली. पुढे एकदा मासेमारीच्या मोसमात तो त्याचे गलबत घेऊन मुंबईच्या किनार्यावर निघाला त्यावेळी नेमके वादळ घोंगावू लागले. वादळाने रुद्र अवतार धारण केला. लक्ष्मणाचे गलबत हेलकावे खाऊ लागले. परिणाम काय आहे हे गलबतावरच्या सर्व खलाशांना आणि लक्ष्मण कोळ्याला कळून चुकले.आता या संकटातून आपले कौशल्य, आज पर्यंत चा अनुभव कामी येत नाही असे लक्षात आल्यावर लक्ष्मणाने श्री स्वामी समर्थ माउली चा धावा सुरु केला.
''हे अक्कलकोट निवासिनी आई SSSSSSS लेकरं संकटात आहेत. धाव आई धाव. या आम्हा सर्वांची तारणहार तूच आहेस.''

इकडे वटवृक्षा खाली विचित्र लीला घडत होती.

स्वामी वडाखाली पलंगावर निजलेले असता. अचानक फटका मारल्या सारखा हवेत हात फिरवला. स्वामींच्या हातातून एकाएकी पाणी पडले.जमलेल्या भक्त गणांना आश्चर्य वाटले. आणि अजून एक अतर्क्य लीला अनुभवयास मिळणार अशा औत्सुक्याने काहींनी स्वामींना विचारले.
स्वामी काय केलेत.आणि हे पाणी कसलं.
स्वामी म्हणाले 'अरे जहाज बुडत होतं! ते बाहेर काढलं'
काहींनी पाण्याची चव घेऊन पाहिली तर चव निव्वळ खारट लागली होती.कुणालाच समर्थांचा हा विचित्र खेळ समजला नव्हता.

इकडे समुद्रात गलबताला एकाएकी जोरात हेलकावा मारून गलबत स्थिर झाले होते. वादळ शमले होते. वादळ शमू शकते या निसर्गाच्या खेळाचा अंदाज लक्ष्मण कोळ्याला होताच. पण एकाएकी धक्का बसून आपले गलबत बुडता बुडता स्थिर कसे झाले याचा काही उगम लक्ष्मण कोळ्याला झाला नाही.
हि स्वामींचीच काही लीला होती हे मात्र कळून चुकले.

लक्ष्मण कोळी मोठ्या आनंदाने स्वामींचे आभार मानत, गुणगान गात किनार्यावर आला.आणि लगेचच अक्कलकोट ला निघण्याची तयारी केली.लक्ष्मण कोळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत विलक्षण कृतज्ञतेने अक्कलकोटी स्वामींचे दर्शन घेण्यास आला. दर्शन घेतले आणि झाला प्रसंग सर्व भाविक भक्तांना सांगितला. तेव्हा १५ दिवसांपूर्वी स्वामींनी केलेल्या लीलेचा, खारट पाणी, अचानक पलंगावरून उठून हवेत मारलेला हात या सर्वांचा उगम सर्वांस झाला.दर्शन घेऊन लक्ष्मण कोळी मोठ्या आनंदाने ठाण्यास परतला आणि तिथे स्वामींचा मठ उभारून स्वामींची सेवा करू लागला.

अशा अनेक कथा ज्यांमध्ये स्वामी माऊली आपल्या असंख्य लेकरांचे रक्षण कसे करते त्याचे दाखले आहेत. त्या आपण या ब्लॉग च्या माध्यमातून वाचणार आहोत.

||श्री स्वामी समर्थ||

No comments:

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||